आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जावीत! नाना पटोलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:49 AM2021-10-17T05:49:48+5:302021-10-17T05:51:30+5:30
कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले; पटोलेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
मुंबई : कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले, याचे कौतुक आहे; परंतु आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. ती द्यायला हवीत, अशी टिपणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्रिपदही सांभाळले होते. ते खाते वापरण्यात आणि प्रशासन चालविण्यात ते ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी पाठ थोपटतानाच, काही घरं सोडायची असतात, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला.
‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी नाना पटोलेंशी संवाद साधला. त्यावेळी नानांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली. “माझ्या घरात कुणी राजकारणी नाही. जानेवारी १९९२ मध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडे तिकीट मागितले होते, पण त्यांनी दिले नाही. घरातूनही कुठली मदत झाली नाही. तरीही मी रिंगणात उतरलो आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकलो. त्यावेळी भ्रष्टाचाराविरोधात काम करायचे. संस्था, कारखाने काढायचे नाहीत, असे वडिलांनी बजावले होते. हा मंत्र आज माझ्या कामाला आला, असे नाना प्रांजळपणे म्हणाले.
निधीसाठी भांडावं!
बाळासाहेब थोरात सरळ व्यक्तिमत्त्व आहे. कुणाचं मन आपल्यामुळे दुखावलं जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो; पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो, असा आरोप आहे. काँग्रेस आमदारांना निधीचे वाटप कमी होते. काँग्रेसच्या हिश्श्याचे जे काही आहे ते मिळाले पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या आमदाराला जास्त निधी मिळेल यासाठी भांडावे, अशी सूचना पटोलेंनी केली.