फर्ग्यूसन कॉलेजच्या प्राध्यापकांचं विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना पत्र
By admin | Published: March 23, 2016 11:26 AM2016-03-23T11:26:18+5:302016-03-23T12:43:48+5:30
फर्ग्यूसन कॉलेजचे प्राध्यापक रवींद्रसिंग परदेशी यांनी पोलिसांना पत्र लिहून कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. २३ - फर्ग्यूसन कॉलेजचे प्राध्यापक रवींद्रसिंग परदेशी यांनी पोलिसांना पत्र लिहून कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र काही वेळातच प्राध्यापक रवींद्रसिंग परदेसी यांनी आपण पाठवलेल्या पत्रात टाईप करताना चूक झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पत्र लिहिताना 'देशविरोधी' हा शब्द चुकून लिहिला गेला असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
फर्ग्यूसन कॉलेजमध्ये मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती त्यावेळी कन्हैय्या कुमार आणि जेएनयूच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. एबीव्हीपीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील 9 फेब्रुवारीच्या घटनेवर 'जेएनयूचं सत्य' असं चर्चासत्र आयोजित केलं होतं. कार्यक्रम सुरु होताच डाव्या विचारसरणीच्या काही विद्यार्थ्यांनी घोषणा देत हा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता असं विद्यार्थ्यांच म्हणणं आहे.
सध्या परिक्षा सुरु असल्याने कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही एबीव्हीपीने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण आणलं होतं. अजूनपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.