गोदावरीने गाठली धोक्याची पातळी: विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:42 PM2017-07-23T13:42:18+5:302017-07-23T13:42:18+5:30
गंगापूर धरणातून साडेआठ वाजेपासून दहा हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरीची पातळी वाढली आहे.
आॅनलाइन लोकमत / नाशिक : गंगापूर धरणातून सातत्याने गोदापात्रात विसर्ग सुरू असून गोदावरीने धोक्याची पातळी गाठली आहे. गंगापूर धरणातून साडेआठ वाजेपासून दहा हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरीची पातळी वाढली आहे.
दोन तासांमध्ये धरणातून सोडण्यात आलेले पाणी शहरातील होळकर पूलाखाली पोहचले. होळकर पूलावरून पुढे ९ हजार ४७० क्यूसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित झाले आहे. दुतोंड्या मारूतीच्या छातीच्या वरपर्यंत पाण्याची पातळी पोहचली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर ओसरला आहे. गंगापूर धरण समुहातदेखील पाऊस कमी झाल्यामुळे सकाळी आठ वाजेपासून अद्यापपर्यंत विसर्गामध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. शनिवारी दुपारपासून रात्रीपर्यंत सलग एक हजार ते दीड हजार क्युसेक ने पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ केली जात होती. कारण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अधिक होते.
गोदावरीच्या परिसरातील नागरिकांना गोवर्धन, गंगापूर गावापासून तर थेट नाशिक शहरमार्गे टाकळी, दसकपर्यंत सावधानतेबरोबरच धोक्याचा इशारा आपत्ती व अग्निशामक विभागाकडून दिला जात आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून गोदाकाठालगत गस्त घातली जात आहे. शहरातील रामकुंड ते तपोवन परिसरात नाशिककरांबरोबरच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील जास्त असते. रविवारची सुटी असल्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर पंचवटी अग्निशामक उपकेंद्र, पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील रामकुंड, तपोवन परिसरात तैनात करण्यात आले आहे.