एलआयसी अध्यक्षांचा राजीनामा?
By admin | Published: June 23, 2016 04:40 AM2016-06-23T04:40:05+5:302016-06-23T04:40:05+5:30
एलआयसीचे अध्यक्ष एस. के. रॉय यांनी येत्या २९ जूनपासून पदावरून मुक्त करण्याची विनंती करण्याचे पत्र सरकारला लिहिल्याचे वृत्त आहे.
मुंबई : एलआयसीचे अध्यक्ष एस. के. रॉय यांनी येत्या २९ जूनपासून पदावरून मुक्त करण्याची विनंती करण्याचे पत्र सरकारला लिहिल्याचे वृत्त आहे. पाच वर्षांची मुदत संपण्यास दोन वर्षे शिल्लक असतानाच सिन्हा यांनी स्वत:हून पद सोडण्याची तयारी दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पदमुक्तीची विनंती करणारे पत्र रॉय यांनी पाठविल्याच्या वृत्तास एलआयसीमधील सूत्रांनी दुजोरा दिला, मात्र त्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दिल्लीतील सरकारी सूत्रांनी सांगितले की, सरकार योग्य तो निर्णय घेईल. नियुक्ती मंत्रिमंडळ समितीकडून होत असल्याने त्यांना पदमुक्त करण्याचा विषयही त्यांच्यापुढे जावा लागेल.
१९८१ मध्ये एलआयसीत रुजू झालेले रॉय यांनी खरेतर असे तडकाफडकी पद सोडावे अशी परिस्थिती वरकरणी तरी दिसत नव्हती. कारण खासगी कंपन्यांची वाढती स्पर्धा असूनही एलआयसीने समाधानकारक व्यवसायवाढ केली होती. (विशेष प्रतिनिधी)