कोकण रेल्वेला एलआयसीची मदत मिळणार
By admin | Published: March 23, 2016 03:49 AM2016-03-23T03:49:16+5:302016-03-23T03:49:16+5:30
कोकण रेल्वेवरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीकडून २५0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
मुंबई : कोकण रेल्वेवरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीकडून २५0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. यामुळे दुहेरीकरणासह, विद्युतीकरण आणि अन्य प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळेल.
कोकण रेल्वेचा पसारा रोहापासून ते ठोकूरपर्यंत असून, यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये सहभागी आहेत. या मार्गांवर सध्या कोकण रेल्वेकडून विकासकामे हाती घेण्यात आली असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. यात महत्त्वाचे काम असलेल्या दुहेरी मार्गासाठी तर दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २९५ कोटी इतका खर्च आहे. दुहेरीकरणाच्या या प्रकल्पात ११ नवीन स्थानकेही बांधण्यात येणार असून, त्यासाठीही निधीची गरज भासणार आहे. कोकण रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरणही केले जाणार असून, हजारो कोटी रुपये खर्च येईल. त्याच्या निधीसाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्न सुरू होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी एलआयसीकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आणि तसा करारही केला. त्याचा फायदा कोकण रेल्वेलाही झाला. (प्रतिनिधी)