‘त्या’ कंपनीचा परवाना रद्द
By admin | Published: November 5, 2016 04:48 AM2016-11-05T04:48:41+5:302016-11-05T04:48:41+5:30
औषध उत्पादनात नामांकित कंपनीने चक्क नकली औषधांची निर्यात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या कंपनीचा परवाना रद्द केला
मुंबई : कांदिवली येथील गेल्या ३५ वर्षांपासून औषध उत्पादनात नामांकित कंपनीने चक्क नकली औषधांची निर्यात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या कंपनीचा परवाना रद्द केला असून, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले प्रमाणपत्रही रद्द केले आहे. ही कंपनी नकली औषधांची निर्यात करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएने अधिक तपास केला. त्यात ही कंपनी नकली औषधांची निर्यात करत असल्याचे उघड झाले.
‘मे. बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड’ असे या कंपनीचे नाव असून, या ठिकाणी टॅब्लेट, कॅप्सूल, इंजेक्शन आणि कर्करोगावरील औषधांचे उत्पादन होते. या कंपनीला जागतिक आरोग्य संघटनेने ‘चांगली उत्पादन पद्धती’ असे प्रमाणपत्र दिले होते. ही कंपनी विविध देशांत औषधांची निर्यातही करते. या कंपनीविषयी मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी दक्षता विभागाच्या सह आयुक्तांच्या अधिपत्याखाली एका चमूने या कंपनीतील औषधांची तपासणी केली.
एफडीएने केलेल्या तपासणीत असे उघड झाले की, ‘पॅरासिटमोल टॅब्लेट ५०० एमजी’ची २ लाख ७५ हजार रुपयांची औषधे वडोदरा येथील मे. सिसमेड लॅबोरेटरीज लिमिटेड या उत्पादकाकडून खरेदी करून स्वत: मे. बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी उत्पादित केल्याचे भासविले जात होते. एप्रिल २०१५मध्ये अशाच प्रकारचा ‘पॅरासिटमॉल टॅब्लेट्स ५०० एमजी’ या १३ लाख ७५ हजार रुपयांचा नकली औषधांचा साठा वेस्ट इंडिज येथे निर्यात केला होता. त्याचबरोबर ‘मेटामॉल टॅब्लेट्स ५०० जीएम’ हे औषध मे. सिसमेड लॅबोरेटरीज लि., वडोदरा येथून घेतले होते. पण, स्वत: कंपनीने उत्पादित केल्याचे भासवले जात होते. (प्रतिनिधी)
>या प्रकरणी उत्पादकास कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावर उत्पादकाने दिलेले स्पष्टीकरण आणि त्यास वैयक्तिक सुनावणीची संधी दिली होती, या सर्व मुद्द्यांचा विचार करून उत्पादकाचे उत्पादन परवाने २५ आॅक्टोबरपासून रद्द करण्यात आले. उत्पादकावर कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला आहे.