तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 10 दिवसांत परवाना- नगरविकासमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:24 AM2021-02-13T03:24:51+5:302021-02-13T03:25:41+5:30

युनिफाइड डीसीपीआरमुळे सुटसुटीतपणा

License for houses up to three thousand square feet in 10 days - Urban Development Minister | तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 10 दिवसांत परवाना- नगरविकासमंत्री

तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 10 दिवसांत परवाना- नगरविकासमंत्री

Next

अहमदनगर : बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’ (युनिफाइड डीसीपीआर) लागू केली असून, त्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांधकाम परवानगी दिली जाईल. वाढीव एफएसआयसह बांधकामाबाबतचे अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतल्याने लोकांना स्वस्तात घरे मिळतील, असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास आढावा बैठक झाली.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, नवीन एकसमान बांधकाम नियमावलींच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.  पूर्वी राज्यात प्रत्येक नगरपालिका व महापालिकेतील बांधकाम नियम वेगळे होते. त्यात अनेक त्रुटी होत्या. यामुळे बांधकाम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी, अशी मागणी होती. त्यामुळे हा निर्णय घेऊन शेवटच्या घटकापर्यंत त्याची माहिती व्हावी, म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा दौरा सुरू आहे. 

वाढीव एफएसआय मिळणार
या निर्णयात बांधकाम करताना वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. त्यामुळे त्याबाबत तक्रारी होणार नाहीत. इमारतीची उंची ५० मीटरपर्यंत वाढवण्याचाही निर्णय केला आहे. परिणामी, विकासकाला फायदा होऊन घरांच्या किमती कमी होतील. एखादी रहिवास इमारत बांधली, तर त्यात एक मजला सोसायटीच्या लोकांना सार्वजनिक वापरासाठी काढता येणार आहे. 
राहण्यासाठी दीड हजार चौरस फुटांपर्यंतच्या घराला केवळ बांधकाम नकाशा व विकास शुल्क लागेल. अन्य कोणतीही परवानगी लागणार नाही. तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत परवानगी मिळेल. यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, असे शिंदे म्हणाले. 

झोपडपट्टी पुनर्विकास योजना नगरमध्येही
झोपडपट्टी पुनर्विकास योजना पूर्वी, मुंबई- ठाण्यापुरती मर्यादित होती; परंतु आता ती इतर शहरांमध्येही राबवण्यात येईल. नगरमध्ये २२ झोपडपट्ट्या आहेत. त्यांच्यासाठीही ही योजना लागू करून त्यांना हक्काची घरे दिली जातील, असे शिंदे म्हणाले. 

Web Title: License for houses up to three thousand square feet in 10 days - Urban Development Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.