फुलशेतीमुळे आयुष्य बहरले!
By Admin | Published: March 27, 2017 04:02 AM2017-03-27T04:02:03+5:302017-03-27T04:02:03+5:30
सव्वा एकर शेतीपैकी १५ गुंठे क्षेत्रात फुलांची शेती करून वर्षाला दोन लाखांवर उत्पन्न मिळवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ
नाना देवळे / मंगरुळपीर (जि. वाशिम)
सव्वा एकर शेतीपैकी १५ गुंठे क्षेत्रात फुलांची शेती करून वर्षाला दोन लाखांवर उत्पन्न मिळवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गणेशपूर येथील राजेंद्र वसंतराव राऊत या शेतकऱ्याने साधली आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गणेशपूर येथील राजेंद्र वसंतराव राऊत यांच्याकडे वडिलोपार्जित सव्वा एकर शेती आहे. यामधील ३५ गुंठे क्षेत्र हे कोरडवाहू आहे, तर गावालगतच १५ गुंठे क्षेत्रही पूर्वी कोरडवाहूच होते. केवळ शेतीवरच चरितार्थ चालविणे शक्य नसल्यामुळे राजेंद्रचे वडील वसंतराव यांनी मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. राजेंद्रने आयटीआय पदविका घेऊन मंगरुळपीर शहरात मॅकनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली; हे काम करीत असतानाच त्याने १५ गुंठ्यात फुलशेती करण्याचा निर्णय घेतला.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गुलाब, शेवंती, गिलार्डी आणि निशिगंध या फूलझाडांच्या कलमांची लागवड केली. झाडांवर वारंवार फवारणी
करून त्यांना वातावरणातील बदलाचा विचार करून वेळोवेळी आवश्यक खते दिली, त्यामुळे त्यांची फूलशेती चांगलीच बहरली. गुलाबाच्या फुलांना दीड रुपया नगप्रमाणे मागणी होऊ लागली, तर निशिगंध, गिलार्डी आणि शेवंतीचा दर्जा चांगला असल्याने त्यांनाही चांगला भाव मिळाला. लग्न सोहळे, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांच्याकडे फुलांची मागणी होऊ लागली. मुस्लीम बांधवांच्या सण, उत्सवातही त्यांचा चांगला व्यवसाय होऊ लागला. महिन्याला सरासरी २० हजार रुपये प्रमाणे अवघ्या १५ गुंठ्यात वर्षाकाठी दोन लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले. येत्या काही दिवसांत शेतीचे क्षेत्र वाढवून फूलशेती वाढविण्याचा व्यापक मनोदय राजेंद्रने बोलून दाखविला.