निर्दोष सुटलेल्या आरोपींना २२ वर्षांनी जन्मठेप
By admin | Published: August 9, 2015 02:24 AM2015-08-09T02:24:29+5:302015-08-09T02:24:29+5:30
सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये झालेल्या खुनांबद्दल तेथील सत्र न्यायालयांनी निर्दोष सोडलेल्या आरोपींना उच्च न्यायालयाने अपिलात अनुक्रमे २२ आणि २३ वर्षांनी जन्मठेप ठोठावली आहे.
मुंबई : सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये झालेल्या खुनांबद्दल तेथील सत्र न्यायालयांनी निर्दोष सोडलेल्या आरोपींना उच्च न्यायालयाने अपिलात अनुक्रमे २२ आणि २३ वर्षांनी जन्मठेप ठोठावली आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही खटल्यांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षींवर विश्वास न ठेवता सत्र न्यायालयांनी साक्षी-पुराव्यांतील क्षुल्लक उणिवा व तफावतींवरून संशयाचा फायदा देत आरोपींना निदोष ठरविले होते. मात्र याविरुद्ध सरकारने केलेली अपिले मंजूर करून न्या. विजया कापसे ताहिलरामानी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयांचे निकाल तर्कट व विपर्यस्त असल्याचे नमूद करत त्याच पुराव्यांवर आरोपींना जन्मठेप दिली. परिणामी खून झाले तेव्हा जेमतेम विशी-तिशीत असलेल्या व त्यानंतर लग्न करून कुटुंबवत्सल आयुष्य जगत असलेल्या या आरोपींना आता उर्वरित आयुष्य तुरुंगात खितपत पडावे लागणार आहे.
यातील पहिला खटला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथील होता.
तेथे ९ मार्च १९९३ रोजी रात्री
दिलीप बाळकृष्ण आजगावकर
या तरुणाचा त्याच्याच घराच्या अंगणात चाकूने भोसकून खून झाला होता.
वारंवार सांगूनही दिलीप त्याच गावातील सरिता मिस्त्री या मुलीचा पिच्छा सोडत नव्हता म्हणून सरिताचा एक चुलता सुरेंद्र रामचंद्र मिस्त्री याने हा खून केला होता.
त्यावेळी ओट्यावर बसलेले दिलीपचे वडील बाळकृष्ण यांनी धावत जाऊन बाजूला ढकल्यावर सुरेंद्र पळून गेला होता. घरात स्वयंपाक करणाऱ्या दिलीपच्या आजीनेही ही घटना खिडकीतून पाहिल्यावर तिही धावत बाहेर आली होती. उदय सावंत व सदानंद म्हसकर हे शेजारी धावत आले तेव्हा त्यांनाही बाळकृष्ण यांनी सुरेंद्रने हल्ला केल्याचे लगेच सांगितले होते.
होळीच्या बंदोबस्तासाठी गावात गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक विजय बंड हेही गडबड ऐकून आले तेव्हा त्यांनाही जमलेल्या लोकांनी सुरेंद्रचेच खुनी म्हणून नाव सांगितले होते.
काही दिवसांनी अंगणेवाडीच्या जंगलात सुरेंद्रला अटक केली गेली व खुनासाठी वापरलेला चाकू व रक्ताने माखलेले बनियन हस्तगत केले गेले होते.
या सर्व साक्षीदारांनी सुरेंद्रनेच खून केल्याचे सांगितले होते. तरीही सत्र न्यायालयाने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
त्याऐवजी खून नेमका ओट्यावर झाली की अंगणात? अंगणात काळोख असताना दिलीपच्या ७४ वर्षांच्या आजीला बाहेर काय चालले आहे हे खिडकीतून दिसलेच कसे? या वयात ती धावत आलीच कशी? अशा शंकांना अवास्तव महत्व देऊन सत्र न्यायालयाने सुरेंद्रला निर्दोष सोडले होते.
शिवसेना-काँग्रेस वादातून खून
दुसरा खून रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील ओवी पेठ गावात २६ एप्रिल १९९२ रोजी रात्री झाला होता. त्याआधी झालेल्या जिल्ह परिषद निवडणुकीवरून गावात शिवसेना व काँग्रेस असे दोन तट पडले होते. शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या मच्छिंद्र जोशी या तरुणाचा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटाने तलवारी, चाकूव काठ्यांनी हल्ला करून खून केला होता.
त्या दिवशी मच्छिंद्र व केसरीनाथ भगत आणि वासुदेव गायकर हे दोन सहकारी नांदगाव येथील इलेक्ट्रिल फिटिंगचे काम उरकून मच्छिंद्रच्या घरी आले. रात्री जेवण करून हे तिघे बाहेर कॉटवर गप्पा मारत बसले होते. मच्छिंद्रचा भाऊ घरात जेवत होता. झालेला खुनी हल्ला मच्छिंद्रच्या भावाने व त्याच्या दोन सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. २७ वार झाल्याने रक्तबंबाळ झालेल्या मच्छिंद्रला त्याचाच आणखी एक भाऊ एकनाथ हा आपल्या ट्रकमधून तळोजा पोलीस ठाण्यात घेऊन गेला होता.
या खटल्यातही सत्र न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास न ठेवता इतर क्षुल्लक गोष्टींना महत्व देत आरोपींना निर्दोष सोडले होते. मात्र अपिलात उच्च न्यायालयाने मोतीराम पदू जोशी व रामनाथ ऊर्फ राम पदू जोशी तसेच रतन व देवीदास मारुती वासकर या सख्ख्या भावंडांना दोषी ठरवून जन्मठेप दिली. राघो धर्मा कोळी, रोहिदास बाळाराम जोशी, सत्यवान बापू वासकर व ज्ञानदेव जोशी या आरोपींचे अपील प्रलंबित असताना निधन झाले.
या दोन्ही अपिलांत सरकारच्या वतीने सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर ए. एस. शितोळे यांनी काम पाहिले. मालवणच्या प्रकरणात आरोपी सुरेंद्रसाठी सरकारकडून अॅड. बी. पी. जाखडे हे वकील दिले
गेले होते. पनवेलच्या प्रकरणात आरोपींसाठी ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते व अॅड. श्रीकांत गावंड यांनी
काम पाहिले.