एड्सग्रस्त खुन्याला फाशीऐवजी जन्मठेप
By admin | Published: May 9, 2014 02:11 AM2014-05-09T02:11:11+5:302014-05-09T02:11:11+5:30
बलात्कार करून अल्पवयीन भाचीची हत्या करणारा आरोपी एड्सचा रुग्ण असल्याने उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी ३० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़
अमर मोहिते
मुंबई - बलात्कार करून अल्पवयीन भाचीची हत्या करणारा आरोपी एड्सचा रुग्ण असल्याने उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी ३० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ ‘निर्भया’ बलात्कारानंतर करण्यात आलेल्या कायदा दुरुस्तीनुसार ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे़ विशेष म्हणजे या आरोपीला बलात्कारासाठी स्वतंत्र १० वर्षांची शिक्षाही झाली आहे़ या दोन्ही शिक्षा एकत्रित न भोगता एकानंतर एक भोगाव्या, असे निर्देशही न्यायालयाने दिले. त्यामुळे फाशी रद्द झाली असली तरी सध्या २९ वर्षे वय असलेला हा आरोपी वयाच्या ७० वर्षांपर्यंत तरी कारागृहातच राहील.न्या़ विजया कापसे-ताहिलरमानी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला़ महत्त्वाचे म्हणजे हा निकाल देण्याआधी खंडपीठाने आर्थर रोड व येरवडा कारागृहातील डॉक्टरांशी सल्लामसलत केली़ त्यात हा आरोपी किमान दोन वर्षे ते जास्तीतजास्त ३० वर्षे जगू शकतो, असे या डॉक्टरांनी स्पष्ट केले़ ते विचारात घेऊन न्यायालयाने त्याची फाशी रद्द करून तो आणखी ४० वर्षे जगला तरीही तुरुंगातच राहील, असा आदेश दिला.