पवित्र नात्यास कलंक लावणाऱ्यास जन्मठेप

By admin | Published: February 22, 2016 12:49 AM2016-02-22T00:49:26+5:302016-02-22T00:49:26+5:30

आपणच जन्माला घातलेल्या मुली व मुलावर लैंगिक अत्याचार करून पित्याच्या पवित्र नात्यास कलंक लावणाऱ्या पुण्यातील एका नराधमाची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम

Life imprisonment for those who blaspheme holy name | पवित्र नात्यास कलंक लावणाऱ्यास जन्मठेप

पवित्र नात्यास कलंक लावणाऱ्यास जन्मठेप

Next

मुंबई : आपणच जन्माला घातलेल्या मुली व मुलावर लैंगिक अत्याचार करून पित्याच्या पवित्र नात्यास कलंक लावणाऱ्या पुण्यातील एका नराधमाची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली.
पत्नीच्या निधनानंतर आईविना पोरक्या झालेल्या आपल्या अल्पवयीन मुलांवर पिता या नात्याने मायेचे छत्र धरण्याऐवजी त्यांनाच आपल्या वासनेची शिकार बनवून आरोपीने घोर विश्वासघात केला आहे. त्याचे हे गुन्हे एवढे भयंकर आणि किळसवाणे आहेत की त्यासाठी जन्मठेपेखेरीज अन्य शिक्षा असूच शकत नाही, असे न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी व न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने नमूद केले.
मुळात आपल्यावर अतिप्रसंग झाला तरी त्याचा बभ्रा होऊ नये याकडे भारतीय स्त्रीचा नैसर्गिक कल असतो. असे असूनही या प्रकरणात १२ वर्षांच्या पीडित मुलीने आपल्याच पित्याविरुद्ध साक्ष देऊन त्याच्या राक्षसी कृत्यांचा पाढा वाचला. त्यामुळे आरोपीचे गुन्हे सिद्ध होण्यासाठी अन्य कोणत्याही पूरक पुरव्यांची गरज नाही, असे
म्हणत न्यायालयाने आरोपीने
मांडलेले बचावाचे सर्व मुद्दे फेटाळून लावले.
पुण्यात कर्वेनगर येथील भारत चिकन मार्केट भागात राहणाऱ्या सुदाम मेश्राम या मध्यमवयीन इसमाच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याच्या १२ वर्षांच्या मुलास व १० वर्षांच्या मुलीस त्याची एक चुलत बहीण आपल्यासोबत राहायला घेऊन गेली. आत्याकडे राहणाऱ्या आपल्या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी सुदाम रविवारी तेथे जात असे. २१ डिसेंबर २०११ रोजी सुदाम चप्पल आणायची आहे, असे सांगून मुलीला आत्याच्या घरून सोबत घेऊन गेला. मृत्युंजय मंदिरामागील नाल्यावरील पुलापाशी त्याने स्वत:च्याच मुलीवर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलीने आत्याला झाला प्रकार सांगितल्यावर पोलिसांत फिर्याद केली गेली. बहिणीप्रमाणेच आपल्यावरही पित्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची मुलानेही फिर्याद दिली.
अशा प्रकारे स्वत:च्याच मुलीवर बलात्कार व अनैसर्गिक अत्याचार व मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याबद्दल चाललेल्या खटल्यात पुण्याच्या सत्र न्यायालयाने सुदामला जन्मठेपेची एक व प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाच्या दोन अशा एकूण तीन शिक्षा ठोठावल्या होत्या. तिन्ही शिक्षा आरोपीने एकदमच भोगायच्या होत्या. याविरुद्ध सुदामने केलेले अपील फेटाळून उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम केली. (विशेष प्रतिनिधी)
(पित्याकडूनच लैंगिक अत्याचार झालेली ही दोन्ही मुले अल्पवयीन आहेत व भावी आयुष्यात त्यांना भूतकाळातील या घटनांचा कलंक वागवावा लागू नये यासाठी या बातमीत आरोपी पित्याचे खरे नाव न देता काल्पनिक नाव दिले आहे.)

याहूनही कडक शिक्षा टळली
अशा नराधमास जन्मठेप हीच शिक्षा योग्य आहे, असे म्हणणाऱ्या
उच्च न्यायालयास मनात आणले असते तर सुदामला याहूनही कडक शिक्षा ठोठावता आली असती. जन्मठेपेचा कैदी १८ ते २४ वर्षांची शिक्षा भोगल्यावर सुटू शकतो. जन्मठेप व प्रत्येकी पाच वर्षांच्या दोन शिक्षा एकानंतर एक भोगाव्या, एवढा बदल जरी उच्च न्यायालयाने केला असता तरी आज ३७ वर्षांचा असलेला सुदाम पुढील किमान २८ वर्षे तुरुंगातच राहील याची खात्री झाली असती.

Web Title: Life imprisonment for those who blaspheme holy name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.