श्याम बेनेगल, चॅटर्जी यांना जीवनगौरव
By admin | Published: January 9, 2016 01:45 AM2016-01-09T01:45:11+5:302016-01-09T01:45:11+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जीवनगौवर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जीवनगौवर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड, तर अॅनिमेशन क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही गौरव करण्यात येणार आहे. ‘स्पार्ट्स अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा या वर्षीचा महोत्सवाचा विषय आहे.
यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) १४ ते २१ जानेवारी या कालावधीत पुण्यात होत आहे. या निमित्ताने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी माहिती दिली. पुरस्कारांचे वितरण दि. १४ रोजी करण्यात येणार आहे.
मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हाय वे’, मकरंद माने यांचा ‘रिंगण’, शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’, प्रसाद नामजोशी दिग्दर्शित ‘रंगा पतंगा’, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ व आदिश केळुस्कर दिग्दर्शित ‘कौल’ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.