कोपर्डीतील जनजीवन पूर्वपदावर
By Admin | Published: July 21, 2016 05:50 AM2016-07-21T05:50:56+5:302016-07-21T05:50:56+5:30
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भीतीदायक वातावरण हळूहळू निवळत आहे
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भीतीदायक वातावरण हळूहळू निवळत असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे़ कोपर्डीसह कुळधरण व कर्जत शहरातील शाळा सुरू झाल्या असून बुधवारी मुलींनीही शाळांत हजेरी लावली़
भीतीपोटी मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते तर मुलींच्या पालकांमध्येही संभ्रम होता. दोन दिवसांपासून परिसरात व्यवहार पूर्वपदावर आले असून, गावासह शेतातील कामेही सुरू झाली आहेत़ घटनेनंतर कोपर्डीतील ग्रामस्थांनीही समजदारपणाची भूमिका घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही़
महिला आयोग सरसावला
महिला व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर यांनी बुधवारी कोपर्डीच्या भैरवनाथ मंदिरात सर्व शाळा, महाविद्यालयातील मुली, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गावात पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांना दिले. बालहक्क आयोगानेही घटनेची दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावात एस. टी. बस तातडीने सुरू करण्याचे, कोपर्डी व कुळधरण येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
>महिनाभरात तपास - रश्मी शुक्ला
बुधवारी पुणे विभागाच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गावाची पाहणी केली. महिनाभरात तपास करून आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.शुक्ला यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. मी तुमच्याबरोबर आहे. घाबरु नका, असा धीरही त्यांनी पीडित कुटुंबाला दिला.
शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील मुलींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी सर्व शाळांना भेटी देणार आहेत. असेही त्या म्हणाल्या.