VIDEO- पतंगराव कदमांच्या शब्दात पतंगराव कदमांचं जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 05:31 PM2018-03-10T17:31:44+5:302018-03-10T17:31:44+5:30
काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सातत्याने महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे पतंगराव शैक्षणिक क्षेत्रातही शिखरावर पोहचले.
- तुळशीदास भोईटे
काँग्रेसचे ज्येष्ठे नेते पतंगराव कदम यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सातत्याने महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे पतंगराव शैक्षणिक क्षेत्रातही शिखरावर पोहचले. मी मराठी चॅनलच्या वॉररुम या कार्यक्रमात त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मला लाभली. पतंगरावांची बहुधा ही टीव्हीवरील अखेरची मोठी मुलाखत...खरंतर मनमोकळ्या गप्पा...तशा शेवटच्याच ! त्यातून जाणवतो एक वेगळा माणूस...राजकारणात, शैक्षणिक जीवनात शिखरावर जाऊनही जमिनीशी नातं टिकवून असलेला ! सरळस्पष्ट बोलणारा ! मोकळं-ढोकळं वागणारा!!
सोपं काहीच नव्हतं
मी ज्या परिस्थितीतून वातावरणातून पुढे आलो…ती वेगळीच. माझं गाव कराडपासून १० किलोमीटरवर. पूर्वीचा सातारा जिल्हा. सोनसळ. यशवंतराव चव्हाणांचं गाव पलिकडे. गाव ४ किमी अंतरावर. १० -१२ गावांच्या इथून एक ओढा वाहतो. त्याचं नाव सोनहिरा. यशवंतराव चव्हाणांनी आत्मचरित्रात दोन प्रकरणं लिहिलीत. त्यांचा जन्म, मराठी शाळेचं शिक्षण तिथेच झालं.
आम्हाला चांगलं आठवतंय की गावात विहिर बांधायला. एका सर्कल साहेबांना भेटायला गावाबाहेर गेलो होतो. असं आमचं गाव. चौथीपर्यंतची माझी शाळा. एक शिक्षक. पाचवी ते सातवी मी ४ किलोमीटर चालत जायचो. आठवी ते ११ वी. मी नाना पाटील हे स्वांत्र्यसैनिक राहिले त्यांच्या बोर्डिंगमध्ये होतो. त्या बोर्डिंगमध्ये सर्व जाती धर्माची मुलं यायची. आणि पंतप्रतिनिधींचं एक गाव...औंधकरांचं...त्यांनी तिथे एक शाळा काढली होती. तिथे मी गेलो बोर्डिंगमध्ये...तिथे दोनदा जेवायला मिळायचं. आमटी आणि भाकरी. वय माझं लहान होतं. बारीक होतो. आठवीला गेलो होतो. घरी असताना दोन-चार वेळेला सवय असते जेवायची लहान मुलांना. उठल्याबरोबर शिळी भाकरी आणि दही. मध्ये लघवीची सुट्टी. त्यानंतर जेवायचं. शाळा सुटल्यावर जेवायचं. दिवसभर जेवायचाच कार्यक्रम असायचा. पुन्हा पोहायला जायचं. मात्र बोर्डिंगमध्ये तसं काहीच नव्हतं. तांबट काका म्हणून आमचा स्वतःचा संसार नसलेला असा ध्येयवादी सुप्रिटंडंट होता. गावोगावी जाऊन ज्वारी गोळा करायचा. मी स्वतः बोर्डिंगमध्ये वर्षभरासाठी एक पोतं ज्वारीचं देऊन राहत होतो.
तालेवार आणि दर्जेदार नेते
पूर्वीचा काळ मी पाहिलाय. एक एक दर्जेदार नेते होते. दर्जेदार मंत्री असायचे. यशवंतरावांचा काळ, वसंतरावांचा काळ, शंकरराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत. यशवंतरावांचं एक होतं. त्यांचा जर दृष्टिकोन वगळला तर बाकी जुने नेते नव्या नेत्यांना पुढे येऊच द्यायचे नाहीत. अशा पद्धतीचं वातावरण होतं. यशवंतरावांनी महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले नवे तरुण हुडकले. त्यांना एकत्र केलं. आणि हे राज्य कठीण परिस्थितीत असताना राज्याचे मुख्यमंत्री झाले. ५६ साली. संयुक्त महाराष्ट्राची प्रचंड जवळ. लहानपणी मला दिसली. प्रचंड संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता. मुंबईसाठी बेळगाव कारवार, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र एक झाला पाहिजे. अशी चळवळ होती. यशवंतरावांना तर पुण्यातल्या एक महिलेनं सभेत चप्पल फेकून मारली होती. मुख्यमंत्री असताना.
काहींचं म्हणणं असं होतं की यशवंतरावांनी मुख्यमंत्री होण्यासाठी ही चळवळ उभारलीय. १०६ लोक हुतात्मा झाले. पंडीत जवाहरलाल नेहरुंची सत्ता होती. इंदिरा गांधी त्यावेळी ऑल इंडिया काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी पंडितजींना वळवलं. त्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या सभा. पुढे त्यांनी जे राजकारण केलं. महाराष्ट्रात त्या काळात ५७, ५२ साली करुणानिधींच्या द्रमुकप्रमाणे. महाराष्ट्रात त्यावेळी असं प्रबळ राजकारण होतं. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण…पृथ्वीराज चव्हाणांचे वडील पाटणमध्ये असे जबरदस्त माणसं होती. यशवंतरावांनी ६० साली महाराष्ट्राची निर्मिती केल्याबरोबर यातली सर्व माणसं मोहिते, आनंदराव चव्हाण, केशवराव, जाधव सर्व प्रमुख माणसं काँग्रेसमध्ये गेली. त्यावेळी खऱ्या अर्थानं काँग्रेस वाढली. बहुजन समाजाची काँग्रेस तेव्हापासून त्याला स्वरुप आलं.
60 सालापासून लहान वयापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता. यशवंतराव, बाळासाहेब देसाई, गजानन बापू, वसंतदादा. यशवंतराव चव्हाण आमच्या गावापासून ४ किलोमीटरवर. या सगळ्यांच नेतृत्व मी जवळून पाहत होतो. प्रत्येकाची कारकिर्द मी जवळून पाहत होतो. बाळासाहेब एक दमदार अॅडमिनिस्ट्रेटर. यशवंतराव मोहिते विचारवंत. मुंबईत आता दररोज घरं पडतायत. मोहिते हाऊसिंग मिनिस्टर असताना घडलं. रात्रभर चाललं होतं. रामभाऊ म्हाळगी..विचारायचे हे उत्तर देत होते. त्यांचं जर ऐकलं असतं तर आता जे घडतंय ते घडलं नसतं. तर असे नेते मी पाहिलेत. म्हणजे यशवंतरावांसारखा नेता आणि रामभाऊ माळगींसारखा आमदार होणे नाही.
मानव निर्मितीपासूनचा गावातला पहिला मॅट्रिक
अशा वातावरणात एका गावात.. मानवाची निर्मिती झाल्यापासून पहिला मॅट्रिक मी.. माझ्या गावात. त्यामुळे अशा वातावरणात मी वाढलो. दिवस इतके वाईट होते की आषाढ श्रावणात ओला दुष्काळ पडायचा. लोकांच्या चुली पेटायच्या नाहीत. माझ्या गावात ४-२ माणसं फक्त बौद्ध समाजातली. मुंबईच्या गिरणीत होतो. कुठे नोकरी नाही, कुठे शिक्षण नाही. आणि दुसरं उत्पन्नाचं साधन नाही. अशा अवस्थेत आमचा तो सर्व परिसर होता. त्याच्यात सातत्याने मला वाटायचं की काही तरी करायला पाहिजे. मात्र काय करायचं ते माहित नव्हतं. कळत नव्हतं दिशा नव्हती. कर्मवीर भाऊराव पाटील हे किर्लोस्करचे एजंट होते. आणि कुंडल आणि किर्लोस्कर वाडी ३ किलोमीटर. शंकरराव किर्लोस्कर हे पहिले मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यावेळी मी एसएससीच्या वर्गात होतो. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की मुलांनी काम करुन शिकलं पाहिजे. लेबर स्किम. ते ऐकल्यानंतर कराड मला जवळ होतं...त्या परिस्थितीत मी सातारला आलो. सातारला आल्यावर मी लेबर स्किममध्ये २-४ महिने. साधारणतः ६ महिने काढले. आणि तिथून मी निर्णय घेतला की हे काही जमायचं नाही. तब्येत बिघडायची. त्यावेळी पुणे विद्यापीठ होतं. शिवाजी विद्यापीठ नव्हतं. त्यावेळी टीडीचा एक कोर्स होता वाडिया कॉलेजला आणि दुसरा होता रत्नागिरीला. त्यावेळी मला प्रोफेसर्सनी मदत केली. या सर्व परिस्थितीत मी पुण्याला १ जून ६१ ला आलो. वाडिया कॉलेजला कमला बाई होत्या. टीडीच्या प्रमुख. त्या म्हणाल्या तुम्ही इतक्या उशिरा आलात. मी ऍडमिशन देते मात्र तुमचं प्रॅक्टिशनल स्कूल तुमचं तुम्ही बघा. पुण्यात कुणाची ओळख नाही पाळख नाही. गावातून ३८ रुपये घेऊन आलो होतो. त्यावेळी खेडापाड्यात मॅट्रिक मुलगा झाला की लोकं खूप यायची भेटायला. बी. जी. पाटलांशी ओळख झाली. वाडिया कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. टीडी वर्षभरात झालो.
मॅट्रिक पासचं बोळातलं विद्यापीठ
माझा मोकळेपणा.. एकंदरीत परिस्थितीतूनच ते घडलं. कारण मी समाजकारणातून राजकारणात आलो. ६४ साली मी भारती विद्यापीठाची मी स्थापना केली. ११ रुपये देणारे ११ लोक मिळत नव्हते. सदाशिव पेठेत एका बोळात एक खोली. भारती विद्यापीठाची. लोक हसायचे. सदाशिव पेठ म्हणजे विद्वानांची. तिथे मॅट्रिक झालेल्या माणसाने संस्था काढायची...त्याला नाव विद्यापीठ द्यायचं...एक चमत्कारच होता. काही पेपरमध्ये नाव आलं. बातमी आली. विद्यापीठ बोळात निर्माण झालं आहे. ते बोळातच विसर्जित व्हावं. बाळासाहेब भारदे म्हणाले, अरे लिहिणाऱ्याने लिहित राहावं. बोलणाऱ्याने बोलत राहावं. आणि करणाऱ्याने करत राहावं.
मला अध्यक्ष हवा होता. यशवंतराव मोहितेंसारखे तडफदार. उपमंत्री होते ते साधे. ते आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले. सायन्स कॉलेजचे प्रिन्सिपल ते उपाध्यक्ष लाभले. अकलूजच्या शाळेचे हेडमास्तर त्याला कार्याध्यक्ष केला. त्यांना बदललं नाही. ५० वर्षात संस्थेची एकदाही निवडणूक झालेली नाही.
भारती विद्यापीठ...थेट अमेरिकेपर्यंत!
राष्ट्रीय एकात्मता काय म्हणतात ते भारतीय विद्यापीठात दिसते. सर्व जाती धर्माचे प्राध्यापक, विद्यार्थी इथे शिकायला आहेत. बाहेरच्या ४५ देशातले मुलं मुली शिकायला आहेत. शहरी, ग्रामीण संस्कृती आम्ही एकत्रित आणली. अशा अनेक गोष्टीतून ही संस्था निर्माण झाली. सरकारमध्ये शिक्षणमंत्री होतो. त्याकाळात कायदा करायला लागायचा रॅगिंगचा. पण भारतीय विद्यापीठात कधी काही घडलं नाही. अशा पद्धतीची संस्था उभी राहिली. आणि आज भारतीय विद्यापीठात ७ हजार प्राध्यापक, ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. राज्यात महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, दिल्ली, दुबईतही स्कूल आहे. आणि अमेरिकेत ४० सेक्टर आहेत मराठी शिकवायचे. तो विषयही समजून घेण्यासारखाच आहे. तिथे आपले जे लोक गेलेत. त्यात जास्त पुण्यातली आहेत. ते मला भेटायला आले. म्हणाले प्रॉब्लम आहे. मी विचारलं काय पगाराचा प्रॉब्लम आहे का. तर म्हणाले. नाही.. आम्ही राहातो तिथे. तिथेच मुलं जन्माला आली. त्यांना आपली भाषा येत नाही. संस्कृती माहित नाही. आम्ही तिथे शिकवतो. मात्र आम्हाला तिथे भारतीय विद्यापीठाचं नाव पाहिजे. तुम्ही सर्टिफिकेट द्या. अशा ४० सेक्टरमध्ये ते आपल्या मुलांना मराठी शिकवायला घालतात. अशा पद्धतीनं त्यांच्या मदतीनं आम्ही अमेरिकेत भारती विद्यापीठ काढलं.
आताचे विद्यार्थी हुशार, मात्र...
पूर्वीपेक्षा विद्यार्थी फार हुशार आहेत. विद्यार्थी कमी पडत नाहीयत. शिक्षकांच्याही पुढे गेलेत अशी नवी पिढी निर्माण झालीय. मात्र शिक्षण कोणतं, कशासाठी आणि कशाची आवश्यकता. नोकरीची आवश्यकता.. पूर्वी मी टीडी अपियर झाल्याने नोकरी मिळाली. आता एमटेक व्हा.. हे व्हा.. ते व्हा.. काही नाही. मी भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत आहे. आम्हाला ५० जागा भरायच्यात ४० हजार अर्ज येतात. हायली कॉलिफाईट, बीएससी, एमएससी.. शिपायाची नोकरी मागतात. इतकी भयावह अवस्था आहे.
विद्यार्थी, शिक्षकांची भयाण स्थिती
ज्युनियर कॉलेजमध्ये विनाअनुदानाचं सूत्र आलं. एका हॉटेलमध्ये प्राध्यापक टेबल पुसायला. डोळ्याला पाहायवत नव्हतं. मग मी एक दिवस आमदारांना बोलावलं. जाहीर केलं की यापुढे विनाअनुदान अजिबात होणार नाही.
विद्यार्थी, शिक्षकांची भयाण स्थिती आहे. मुलगा शाळेत का जातो. पालक का पाठवतो. त्याला माहित नाही. शाळा का शिकवते तिलाही माहित नाही. अशी मधली फेज येऊन गेली. आता लोकं कॉन्शियस झाली. शाळा कुठली चांगली ते शोधतात.
परवाच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ३ क्षेत्रात तपासणी केली. फार्मसी, इंजिनियरिंग आणि मॅनजमेंट.. याचा अभ्यास केला. आणि नावं जाहीर केली. माझं फार्मसी कॉलेज देशात चार नंबरला आलं. आणि महाराष्ट्रात पहिल्या नंबरला. पुण्याचं.
माझं इंजिनियरींग कॉलेज देशात ६१वं आणि महाराष्ट्रात पहिलं. मॅनेजमेट कॉलेज देशात ४७ वं आणि महाराष्ट्रात पहिल्या ३ मध्ये. मेरिट बघायला आता सुशिक्षत पालक येतात. विद्यार्थी हुशार मात्र नोकऱ्या ज्या पद्धतीनं पाहिजेत ती अवस्था राहिलेली नाही.
आज हे मेरीटवरती. जिल्हा, म्युन्सिपालिटी शाळा यात शिक्षण ८० टक्के.. १० टक्केच खासगी शाळा. एखाद्या शाळेत ५ लाख, ८ लाख फी या बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेत. या ५ टक्के शाळा आहेत. मेजॉरिटी आपल्याकडच्या शाळा या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. नगरपालिकेच्या शाळा आहेत. हायस्कूल खासगी आहे. माझ्या शाळा ८० आहे. एकाही शाळेचा निकाल ८५ टक्क्याखाली आलेला नाही.
माझ्या संस्थेत ५० वर्षात नोकरीसाठी पैसे घेतल्याचा प्रकार घडलेला नाही. नाव घ्या.. १लाख रुपये बक्षिस घ्या.. कुणाला पगार कमी मिळाला. नोकरीसाठी पैसै मागतात. तुम्ही तपासा. निर्णय घ्या.. अक्शन घ्या.. त्याला आमचा पाठिंबा..३०० पट इंडस्ट्री वाढली.
पूर्वी डेंटल कॉलेज महत्वाचं होतं. आता पगार कमी देणं. याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. माझा पाठिंबा.
शिक्षणातून राजकारणात!
हडपसरला पार्टटाईम शिक्षक होतो. पगार ३५ रुपये. मी फुल टाईम शिक्षक नव्हतो. कारण मला शिकायचं होतं. पुढे मी बीए झालो. एमए झालो. एलएलबी झालो. मॅनेजमेंटमध्ये पीएचडी झालो. हे सर्व शिक्षण केलं. नाही तर कुलपती मॅट्रिक झालेला नाही चालणार ना लोकांना...शिक्षण, कॉमनसेन्स आणि व्यवहार यात मोठा फरक आहे. वसंतराव सातवी शिकले. मात्र स्ट्राँग कॉमनसेन्स होता. त्यांनी शिक्षणाचं महाराष्ट्रात मोठं धोरणच आणलं. महाराष्ट्रात इंडस्ट्री ३०० पट वाढल्या. पण, मी पुणे विद्यापीठात निवडून आलो. मी झेडपीच्या नादी नाही लागलो. कायदा बदलल्यानंतर मी १२ वर्ष पुणे विद्यापीठाचा हेड काऊंसिल होतो. आणि एरिया कुठला तर आमचा एरिया म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर, धुळे, जळगाव, नाशिक याच्यातून पदवीधर म्हणून मी निवडून येतो. त्यानंतर मी सिनेटमध्ये निवडून येतो. १२ वर्ष सोपी नव्हती. त्यानंतर नंतर मी आमदार म्हणून मुंबईत आलो. शरद पवार मुख्यमंत्री. मी म्हटलं मुंबई विद्यापीठातून लढवतो. तर म्हणाले. तुम्हाला इथे मतं कोण देणार? २२ मतांचा कोटा होता मला ७६ मतं पडली. आजपर्यंत कुणी माझा रेकॉर्ड मोडला नाही आणि पुढे कुणीही मोडणार नाही.
सर्व पक्षांमध्ये मित्र
राजकारणाचे कंगोरे निवडणुकीपुरतेच असतात. सर्व पक्षात माझे मित्र. गोपीनाथ मुंडे आता नाहीत मात्र माझे खास मित्र आणि गडकरी.. निवडणुकीत जो काही प्रचार झाला. आणि मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ होते. ते पंतप्रधान नव्हते. त्यामुळे पॉलिटिकली जो काही प्रचार होतो. लोकं निर्णय घेतात.
नरसिंहराव पंतप्रधान झाले. मी राजीव गांधींना म्हटलं होतं की तुम्ही भारती विद्यापीठात या. मी अशी एक संस्था काढली आहे. ते म्हणाले.. पतंगराव मी इलेक्शननंतर येतो. मात्र आमचे एचआरडी मिनिस्टर पी.व्ही. नरसिंहराव हे फार विद्वान आहेत त्यांना घेऊन जा.. राजीव गांधींनी त्यांना फोन केला की पतंगराव कदम येतायत. मग ते भारतीय विद्यापीठात आले. त्यांना १४ भाषा येत होत्या मराठीसह. त्यांनी भारती विद्यापीठ बघितलं. अशा पद्धतीनं त्यांचा आणि माझा संबंध आला.
मनमोहन सिंग हे यूजीसीचे चेअरमन होते. ते पुणे विद्यापीठात आले होते. मला नरसिंहरावांचा फोन आला की मनमोहन सिंह तुझ्याकडे आलेत का. मी म्हटलं नाही ते पुणे विद्यापीठात आलेत. फोन दे म्हणाले. फोन घेतला आणि बोलले. पुढे ते फायनन्स मिनिस्टर झाले. या देशाला आज ना उद्या तुम्हाला मला याची दाद घ्यावी लागेल. देश अडचणीत आला होता. त्यांनी नवीन फायनॅन्शियल धोरण घेतलं. आणि मनमोहन सिंगांना चार्ज दिला. म्हणून हा देश वाचला आणि सावरला.
राजकारण सोपं नव्हतंच
महाराष्ट्रात वसंतराव, यशवंतराव अनेक मंत्री होऊन गेले. जिल्ह्या- जिल्ह्यात मंत्री होते. कुणाला तरी धरुन आणा आणि मंत्री करा अशी स्थिती नव्हती. त्यामुळे लीडरशीप होती. काँग्रेस तशीच वाढली. पुढे सगळी चिल्लर झाली. काही राहिलं नाही.
१५ वर्ष आम्ही एकत्र. त्याआधी ५ वर्ष मी मंत्री. दिल्लीला न जाता. कुणाच्याही मध्ये न पडता २० वर्ष मी मंत्री होतो. पहिल्यांदा माझी सुरुवात झाली ती वसंतदादांसारखा नेता. त्यांची ती पठडी होती. ६७ साली राजारामबापू आणि वसंतदादा असे २ गट पडले. यशवंतराव चव्हाण कऱ्हाडला आले होते. ते एकमेव नेते होते. यशवंतरावांना विचारल्याशिवाय झाडाचं पानंही हलत नव्हतं. आम्ही कऱ्हाडला गेलो. वसंतराव सातवी शिकलेला नेता. मात्र केवढा मुत्सद्दी. ते म्हणाले. काही भांडणं नाहीत. मलाही तिकीट देऊ नका आणि राजाराम बापूंनाही देऊ नका. दादा मास लीडर. धोतर घालून बसायचे. आपला माणूस.. तर असं त्यावेळी वातावरण होतं. या लढाईत खानापूर तालुक्यात राजाराम बापू तुल्यबळ होते. एकही तिकीट त्यांना मिळालं नाही फक्त स्वतःचं सोडून. त्यामुळे मलाही तिकीट मिळालं नाही.
एसटीपासून गतीमान प्रवास
एक महत्वाचं झालं. ६७ ला तिकीट मिळालं नाही. ६८ ला यशवंतराव मोहितेंनी हाऊसिंग बोर्डाचे आणि एसटीचे मंत्री झाले. ६० साली ते उपमंत्री होते. त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली की मी त्यांचं ऋण विसरणार नाही. मला एसटी बोर्डाचं डायरेक्टर केलं. धुळप, आबासाहेब निंबाळकर, ममदानी अशी बरीच मंडळी होती. त्यावेळी माझ्याकडे मोडकी सायकल नव्हती. ती इम्पाला गाडी. मला पाकिट आलं. अर्धा तास गेला नाही तर ८-१० गाड्या मोठ्या ऑफिसर्सच्या आल्या. मला कळेना काय झालं. ते म्हणाले की खाली गाडी दिसतेय ती आजपासून तुमची. तुम्ही एसटीचे डायरेक्टर झालात. फार मोठे झालात. १ जुलै ६८.
६८ ते ७३ पाच वर्ष मी एसटीचा डायरेक्टर होतो. विलासराव देशमुख एमईएस कॉलेजचा विद्यार्थी.. गाडी बघायला पळत पळत येणार.. इम्पाला लांबडी गाडी अशी.. त्यामुळे लोकांच्या मनात आलं की मी इलेक्शनला उभं राहिलं पाहिजे. मला माहित होतं की मला तिकीट मिळणार. दादांना पर्याय नव्हता.. धोतरात कोण.. राजाराम बापूला घ्यायचं की या नवीन पोराला घ्यायचं. माझ्या लोकांनी निर्णय घेतला आणि मला ८० ला उभं केला. पेटीत निवडून आलो. आणि पोस्टाच्या मतात मला फक्त २५ मतं कमी मिळाली. पुन्हा ८५ ला उभा राहिलो. ३० हजाराने निवडून आलो. अपक्ष म्हणून.. माणूस निवडून आला की कोणतीही पार्टी बोलावते.. या.. या म्हणून.
पॉवरफुल लिडरशीपचा काळ
पूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. पूर्वी नगरही आमच्यात होतं. हा पश्चिम महाराष्ट्र. यामध्ये पार्टी, नेते जबरदस्त होते. एकेकाळ तर असा होता की कराडच्या ४ किलोमीटरमध्ये ५ मंत्री होते. त्यामुळे पॉवरफुल लिडरशीप होती. विचार होते. धारणा होती. १९६२ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी महाबळेश्वरमध्ये कृषी औद्योगिक विकासाची घोषणा केली. महाराष्ट्रात साखर कारखाने, जिल्हा बँका निघाल्या. त्यातून परिवर्तनाचं वारं सुरु झालं. इतर राज्यात शिक्षण संस्था या सरकारच्या. फक्त महाराष्ट्रातच टिळक, आगरकरांनी काढलेल्या संस्था असो भाऊराव पाटलांची रयत असेल, स्वामी विवेकानंद संस्था.. या सगळ्या संस्था खासगी लोकांनी चालवल्या. आणि महाराष्ट्रात सरकारपेक्षा मोठ्या केल्या.
महाराष्ट्राच्या मुंबई युनिव्हर्सिटीत मी होतो. त्याच वेळी मंत्री झालो. शिक्षणमंत्री. व्हाईस चान्सलर होते नेहरु बंगाली. ते म्हणाले. तुम्ही राजीनामा देऊ नका. मी म्हटलं. बघा असं आहे. की आलो की तुम्ही उठून उभं राहणार. आता तुम्ही आलात की मी उठून उभा राहतो.
खाली बघून सांगितलं की समजायचं की पत्ता कट
विधानसभेत मर्यादित काम. विरोधी पक्षात अपोझिशन काम. एका मताने आम्ही जास्त असल्याने आम्हाला काँग्रेसला मिळालं. मग काम कसं चालतं. मुख्यमंत्री कसे निवडले जातात. मी ६ वेळा ८ मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होतो. खाली बघून सांगितलं की समजायचं की पत्ता कट आहे.
एक काळ असा होता की माणसं नेमायची, अपॉईंट करायची. रामराव, दादांची इलेक्शन झाली त्यावेळी ठरलं होतं की दादांना करायचं. तसंच झालं.
पतंगरावांवर अन्याय झाला?
न्याय,अन्याय व्हायला मी कोण होतो. खेड्यातला छोटा माणूस ज्याचा तलाठ्यापर्यंत ओळख नव्हती. तो २० वर्ष मंत्री झाला. शिक्षणमंत्री, उद्योगमंत्री, सहकारमंत्री ५ वर्ष होतो. २ वर्ष महसूलमंत्री होतो. संसदीय कामकाज मंत्री होतो. दुष्काळाच्या काळात पुनर्वसनाची क्रांती केली. फॉरेस्ट मिनिस्ट्रीमध्ये ६० हजार कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पर्मनंट केलं. लाखो झाडं लावली. जे डिपार्टमेंट कुठेच नव्हतं तिथे काम केलं. जिथे जायचं तिथे उद्योग करायचे. ज्या खात्यात काम केलं ते १०० टक्के इफेक्टिव्ह होतं.इतके वर्ष मंत्री झालो. पुण्यात राहून सांगलीत होतो. ही काही चेष्टा नाही. माझी दिल्लीत लॉबी नाही. कुणाचीही ओळख नव्हती दिल्लीत. आता सोनिया जी, राजीव गांधींशी चांगले संबंध आले. राहुलसोबतही.. राहुल आणि विश्वजीतचे चांगले संबंध. मग एकाच टीममध्ये दोघांनी कशाला राहायचं. सोनियाजींसोबत मी बोलतो. मनमोकळेपणाने. जे वाटतं, पटतं ते बोलतो. एक काळ असा गेला. की हात वर करा.
वेळेनुसार मत्सर वाढलाय
वेळेनुसार मत्सर वाढला आहे. गावपातळीपासून वाढला आहे. त्यात नवं काही नाही. तालुका, जिल्हा पातळीवर एस्टॅब्लिश लोकं नव्या लोकांना येऊ देत नाही. त्याला वेगळ्या पद्धतीनेच सामोरं जावं लागतं. प्रत्येक पक्षासोबत हेच आहे. ज्या पक्षाची सत्ता असते. तिथे लॉबी असते. नवीन लोकं येतात त्यांना दाबलं जातं.
सध्याचा काळ घोषणाबाजीचा!
त्यांचं स्लोगन झालंय कुठलाही विषय आला की. १५ वर्षात काय केलं. अरे.. म्हणून तर तुम्हाला निवडू दिलंय. तुम्ही दिवे लावा.. याला अर्थ नाही. सरकार ही एक कंटीन्यू प्रोसेस आहे. माणसं येतात जातात. वैधानिक मंडळाचा विषय आहे आपल्या महाराष्ट्राचा. त्यात फार मोठी चूक झाली. त्यामुळे बजेट वाटताना राज्यपालांच्या मान्यतेकडे सरकारचे अधिकार गेले. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा हे दोन नवीन भाग आले पश्चिम महाराष्ट्रात. विदर्भाशी करार झाला. मराठवाडा तर बिनशर्त आला. आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली. माडगुडकरांनी प्रश्न विचारला होता की हे राज्य कुणाचं आहे यशवंतराव? यशवंतरावांनी उत्तर दिलं हे राज्य मराठी माणसाचं आहे. या महाराष्ट्रात जो जो राहतो त्या मराठी माणसाचं. आता मात्र लोकांना आवडणाऱ्या घोषणा मारायच्या. चांग भलं..असा कार्यक्रम आहे सध्याचा!
आधी निर्णय नंतर परवानगी!
काँग्रेसमध्ये मी महत्वाची खाती सांभाळली. मात्र मदत आणि पुनर्वसन खातं माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं खातं आहे. माझ्याकडे हे खातं असताना अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, कडक दुष्काळ पाहिला. कसं चालवलं. माझ्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट, ९ मंत्री, ९ सेक्रेटरी.. दर मंगळवारी पहिल्याच दिवशी मी मिटिंगची नोटीस काढली आणि सांगितलं आजपासून नोटीस निघणार नाही. ३ वाजता मिटिंग होईल. मंत्र्यांना, आमदारांना सांगितलं की तुमच्या जिल्ह्यात काही प्रश्न असतील तर मांडा, सांगा. आणि आम्ही निर्णय घेत होतो. माझा प्रस्ताव गेला की पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अजित पवार कधीही कुणीही मंत्रिमंडळात माझ्या प्रस्तावाला विरोध केला नाही. लगेच त्याच दिवशी जीआर आणि डायरेक्ट पैसे कलेक्टरकडे.. फटाफट निर्णय घेत होतो. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यात गेलो. जिल्ह्यात गेल्यावर अधिकाऱ्यांना विचारायचो..की काय अडचणी आहेत तुमच्या. ते सांगायचे.. मी आदेश द्यायचो.. उद्या सकळी जीआर मिळेल हातात. आदेश, जीआर मिळाल्याशिवाय अधिकारी काम करत नसतो. घोषणांवर अधिकारी काम करत नसतो. त्याच्या हातात जीआर लागतो. त्याच दिवशी पैसे कलेक्टरकडे.. अशा पद्धतीनं दुष्काळ हाताळला. आचारसंहितेवेळी रात्री ११ वाजता कॅबिनेट लागली. त्यावेळी सांगितलं. आचारसंहितेनं सरकार बरखास्त करु नये, लोकं जीवंत ठेवायची आहेत की नाही. आपण निर्णय घ्यायचे आणि परवानगी नंतर मागायची. मग मी साडे बारा हजार कोटी अतिवृष्टी, दुष्काळाला.. आणि पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होत होते.
कोंबडीचं खाऊन जाता...
देशातल्या सहकार चळवळींपैकी ५० टक्के चळवळी या महाराष्ट्रात आहेत. बाबासाहेब केदार म्हणाले. तुमच्याकडच्या संस्था चालतात आमच्याकडच्या का नाही. त्यांना म्हटलं तुम्ही कोंबडीच खाताय. अंडी कशी मिळणार.. आमच्याकडे कोंबड्या वाढवतात. एकेक अंडी खातात. सहकारात ज्यांनी चुकीचं केलं त्यांच्यावर अॅक्शन घ्या. मी विधानसभेत म्हणालो. तुमची मोठी संस्था आहे. आरएसएसचा उल्लेख केला नाही. एक एक संस्था काढा. दुसऱ्याच्या संस्थेतली माणसं पाठवायची. ही अशी वेळ आलीय.
काँग्रेसला सत्तेत आणण्याची ऐतिहासिक जबाबदारी
कॉग्रेसला एकच सल्ला.. लोकांच्या मनात काँग्रेसशिवाय कुणीही राज्य करु शकणार नाही. लोकांना कळतंय याही स्थितीत. आजही सरकार जी आलीत ती लोकप्रियतेची लाट आता राहिलेली नाही. राज्य चालवायचं काम काँग्रेसनेच करावं. आज ज्या स्थितीत काँग्रेस चाललीय. ती स्थिती मला मान्य नाही. खिशातले बगलबच्चे काढायचे ते योग्य नाही. मास ट्रेड ओळखले पाहिजेत. इफेक्टिव्ह कोण आहे. खरा कार्यकर्त्याला हुडकून धरुन आणलं पाहिजे. भाजपात राष्ट्रवादीतून माणसं गेलीत. ओरिजिनल माणसं पुरवायचं काम ६० वर्ष काँग्रेसनं केलंय. तेव्हा काँग्रेसमुक्त ही कल्पना योग्य नाही. लोकशाहीत कुणीही येतो कुणीही जातो. कायमपण कुणीही घेऊन येत नाही. लोकांनी ठरवलंय. आता काँग्रेसला सत्तेत आणायचं. काँग्रेससाठी ती मनस्थिती तयार करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागेल.