तरुणीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्यास जन्मठेप

By admin | Published: February 23, 2016 12:44 AM2016-02-23T00:44:59+5:302016-02-23T00:44:59+5:30

एकतर्फी प्रेमाचा अव्हेर करून लग्नास नकार दिला म्हणून सुमारे ११ वर्षांपूर्वी पुण्यातील एका तरुणीवर सल्फ्युरिक अ‍ॅसिड फेकून तिला कायमचे विद्रूप करणाऱ्या कैलास सीताराम

Life sentence for acid thrower | तरुणीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्यास जन्मठेप

तरुणीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्यास जन्मठेप

Next

मुंबई : एकतर्फी प्रेमाचा अव्हेर करून लग्नास नकार दिला म्हणून सुमारे ११ वर्षांपूर्वी पुण्यातील एका तरुणीवर सल्फ्युरिक अ‍ॅसिड फेकून तिला कायमचे विद्रूप करणाऱ्या कैलास सीताराम अडागळे या फरार आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पुण्याच्या सत्र न्यायालयाने कैलासला ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध कैलासने निर्दोष मुक्ततेसाठी व सरकारने शिक्षा वाढविण्यासाठी अपील केले होते. ते गेली ९ वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित होते. न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठाने कैलासचे अपील फेटाळले व सरकारचे अपील मंजूर करून त्याची शिक्षा ७ वर्षांवरून जन्मठेप अशी वाढविली. तसेच दंडाची रक्कमही १० हजार रुपयांवरून वाढवून २ लाख रुपये करण्यात आली. दंड न भरल्यास कैलासला आणखी २ वर्षे सश्रम कारावास भोगावा लागेल. दंड वसूल झाल्यावर ती रक्कम पीडित तरुणीला भरपाई म्हणून दिली जावी, असाही आदेश खंडपीठाने दिला.
सत्र न्यायालयाचा निकाल झाला तेव्हा कैलास तुरुंगात होता. शिक्षा भोगत असताना पाच महिन्यांनी आॅगस्ट २००७ मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला; मात्र त्यानंतर तो तुरुंगात परतला नाही. २९ आॅगस्ट २००७पासून तो फरार आहे. गेली ८ वर्षे शोध घेऊनही पोलिसांना तो सापडलेला नाही. आता पोलिसांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न नेटाने करावेत व जन्मठेप भोगण्यासाठी त्याला तुरुंगात हजर करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
कैलासने ३१ जानेवारी २००५ रोजी सायंकाळी विप्रो स्पेक्ट्रोमॅट कंपनीच्या गेटवर नेहा अजय मालवीय या तरुणीवर अ‍ॅसिड फेकले होते. त्या वेळी २१ वर्षांची असलेली नेहा गंभीर जखमी झाली होती. प्रदीर्घ उपचार व प्लॅस्टिक सर्जरी करूनही विद्रूपता आजही पूर्णपणे गेलेली नाही.
नेहा पूर्वी कल्याणीनगर येथे इन्फोसिस कंपनीत नोकरी करायची. त्या वेळी कंपनीने नेहासह इतर कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी दिलेल्या टाटा इंडिका मोटारीचा कैलास हा ड्रायव्हर होता. तो नेहाशी अघळ-पघळ बोलून सलगी करण्याचा प्रयत्न करायचा. जानेवारी २००५मध्ये नेहाने इन्फोसिसमधील नोकरी सोडली व ती विप्रो कंपनीत नोकरीस लागली. तरीही कैलास तिचा पिच्छा पुरवत असे. ३१ जानेवारी २००५ रोजी सायंकाळी कामावर जाण्यासाठी आलेल्या नेहाला कैलासने कंपनीच्या गेटवर गाठले. गोड बोलून तो नेहाला मोटारीत घेऊन गेला. पुन्हा एकदा त्याने लग्नाची गळ घातली; मात्र नेहाने नकार दिल्यावर अ‍ॅसिडची बाटली नेहाच्या अंगावर ओतली.
असह्य वेदनांनी व्याकूळ झालेली नेहा धावत कंपनीच्या गेटमधून आत पळाली. कैलास पळून जाण्यासाठी एका रिक्षाकडे धावला. विप्रो कंपनीच्या स्टाफ कारचे शोएब शेख व अमजद सैयद तिथेच गप्पा मारत होते. पळणाऱ्या कैलासला पकडून त्यांनी कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाली केले. पुढे न्यायालयात शोएब व अमजद यांची साक्ष महत्त्वाची ठरली. (विशेष प्रतिनिधी)

जरब बसेल,अशी शिक्षा हवी
कैलासने केलेला गुन्हा किती गंभीर आहे व त्यासाठी त्याला कडक शिक्षा का व्हायला हवी याची सविस्तर चर्चा करूनही, सत्र न्यायालयाने सरतेशेवटी मवाळ शिक्षा दिली, याबद्दल खंडपीठाने नाराजी नोंदविली. एकतर्फी प्रेमाने बेभान झालेल्या कैलासने पूर्ण तयारीनिशी हा अ‍ॅसिडहल्ला केला. नेहाचे आपल्याशी लग्न होणार नसेल, तर ती आयुष्यात कोणाशीच लग्न करू शकणार नाही, अशी तिची अवस्था करण्याचा दुष्ट आणि विकृत विचार यातून स्पष्ट दिसतो. समाजात असे गुन्हे वाढत चालले आहेत व त्याची दखल घेऊन सरकारने अलीकडेच कायद्यात कडक शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यासाठी शिक्षा केवळ गुन्ह्याच्या गांभीर्याशी समानुपाती नव्हे, तर इतरांना जरब बसेल अशीही असायला हवी, असे खंडपीठाने नमूद केले.

बचावासाठी सरकारकडून वकील
या अपिलांच्या कामासाठी कैलासने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांना वकीलपत्र दिले होते, परंतु कैलास फरार असल्याचे कारण देत, वारुंजीकर यांनी वकीलपत्र मागे घेतल्यावर न्यायालयाने कैलासच्या बचावासाठी सरकारकडून अ‍ॅड. नसरीन एस. के. अयुबी यांना वकील म्हणून नेमले. सरकारतर्फे अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर अरुणा पै यांनी तर नेहासाठी अ‍ॅड. डॉर्मन दलाल यांनी काम पाहिले.

Web Title: Life sentence for acid thrower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.