आयुष्याचाच झालाय तमाशा!
By admin | Published: February 21, 2016 02:39 AM2016-02-21T02:39:13+5:302016-02-21T02:39:13+5:30
महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या एका तमाशा महोत्सवाच्या अंतर्गत तमाशा मंडळांना ५१ हजार रुपयांची बिदागी दिली जाते. मिळालेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने या कलाकारांना गावातील सावकाराकडून ३ ते ४ टक्के दराने कर्ज काढावे लागते.
वाशी येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१६निमित्त तमाशा कलावंतांशी चर्चा केली असता आमच्या आयुष्याचाच तमाशा झाल्याचे वक्तव्य कलाकारांनी केले. कला जिवंत ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे हे शासन लोककलेला मात्र जिवंत ठेवण्यात निष्क्रिय ठरत आहे. वर्षातले चार-पाच माहने गावोगावी हिंडावे, बाजार-जत्रांत तमाशाचे खेळ करावेत, मिळतील ते पैसे जमवावेत आणि त्यातून वर्षभर कुटुंबाची भूक शमवावी लागते. ही व्यथा आहे तमाशा कलावंतांची. वर्षानुवर्षापासूनची ही कला आता पार कालबाह्य होत चालली असून, कलाकारांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून राज्यात तमाशाची दहा-पंधरा मोठी मंडळे उरली आहेत. दसरा ते अक्षय्यतृतीया असे सहा-सात महिने त्यांचे कार्यक्र म होतात. छोटी मंडळे मात्र गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंतच तमाशा करतात. नाशिक जिल्ह्यात अशा विसेक पार्ट्या आहेत. महाशिवरात्रीनंतर त्यांच्या सुपाऱ्या ठरण्यास प्रारंभ होतो आणि तारखा ठरवल्या जातात. जिथली सुपारी असेल त्या गावी दोन ट्रक, दोन बसेससह दुपारी पोहोचावे, साहित्य उतरवावे, तंबू, स्टेज उभारावेत, रात्री पाचेक तासांचा तमाशा संपल्यावर मध्यरात्री पोटात चार घास ढकलावेत आणि जमिनीला पाठ टेकावी... दुसऱ्या दिवशी सकाळी पुढल्या गावाच्या दिशेने प्रवास करायचा, असा या कलावंतांचा दिनक्र म. तमाशात गण, गवळण, रंगबाजी (लावण्या, नृत्ये), वगनाट्य सादर केले जाते. ‘फार्स’ (विनोदी नाटिका) सादर केली जाते. गायक, वादक, नर्तक, वगनाट्यातील अभिनेते, सोंगाड्या, बिगारी, आचारी, ड्रायव्हर या साऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी तमाशा सादर केला जातो. ‘कार्यक्र म रंगला नाही’असे कारण पुढे करीत तमाशाच्या आयोजक मंडळींकडून अनेकदा ठरलेले पैसेही दिले जात नाहीत, अशा अनेक व्यथा कलाकांनी मांडल्या. अनेक कार्यक्र म करूनही काही वेळेस जेवणासाठीही पैसा शिल्लक राहत नसल्याची माहिती महिला कलाकारांनी दिली. वेतन देणे मालकाला परवडत नाही. कलावंतांना मोसम सुरू होण्यापूर्वी ठिकठिकाणाहून खास सरावासाठी महिनाभर आधी बोलवावे लागते. त्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करावी लागते.
महोत्सवातही गैरसोयी
वाशी रेल्वे स्थानकाजवळी मैदानावर आयोजित या महोत्सवात परगावाहून आालेल्या कलावंतांसाठी शौचालयाची व्यवस्था देखील केलेली नसून, महिला कलाकारांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तान्ह्या मुलांचे हाल
तमाशा फडातील कलाकारांची तान्ह्या मुलांना रात्रीच्या वेळी रिकाम्यापोटी झोपावे लागते. कार्यक्रमात कला दाखविणाऱ्या कलाकारांना त्यांच्या मुलांकडे पाहायला सुद्धा वेळ मिळत नाही.
दिवसभर आईवडिलांसोबत उन्हातान्हात भटकून दमलेल्या या जीवांना कित्येकदा रात्र उपाशीपोटी काढावी लागते. कार्यक्रम सुरू असताना अडचण होऊ नये म्हणून बाजूला सारलेली ही मुले कधी झोपी जातात याचीही खबर नसते.
गावोगावी फिरस्तीवर असणारी या कुटुंबातील पोरंबाळं मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. यामधील ९५ टक्के मुलांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले
नाही.
महिला कलाकारांशी संवाद साधला असता महिला नृत्यांगना छाया काटे यांनी महिला कलाकारांना समाजाचा तिरस्कारही सहन करावा लागतो. रस्त्याने चालतानाही ‘तमाशावाली’ किंवा ‘नाचणारी’ आली, असे टोमणे ऐकावे लागतात. त्यांच्याकडे हमखास वाईट नजरेने पाहिले जाते.
कलावंतांची शासनाकडून दखलही घेतली जात नाही. कलावंतांची ही उपेक्षा पाहता म्ािहलावर्ग, वादक यांनी मात्र या लोकक लेकडे पाठ फिरविली आहे. कार्यक्रमाचा रोजचा खर्च ४० ते ४५ हजार रुपये इतका असून, एवढा पैसा उभारायचा तरी कसा, यातून काही शिल्लक राहतच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कसा करणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कलावंतांना न परवडणाराच आहे. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांच्या समस्या आधी सोडविल्या पाहिजेत.
- भीमराव गोपाळ,
संचालक, भिका भीमा
सांगवीकर लोकनाट्य
तमाशा मंडळ, सांगवी