नगरसेवकांपासून जिवाला धोका
By Admin | Published: March 5, 2015 12:11 AM2015-03-05T00:11:24+5:302015-03-05T00:14:43+5:30
तृप्ती माळवी यांची पोलिसांत फिर्याद
कोल्हापूर : महानगरपालिकेतून बाहेर पडत असताना मंगळवारी नगरसेवकांनी आपल्या वाहनावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून या घटनेमुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात यावी तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी फिर्याद महापौर तृप्ती माळवी यांनी बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
महापौर माळवी यांनी मंगळवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबद्दलचा तक्रार अर्ज दिला होता. या अर्जात उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, गटनेता शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, सचिन चव्हाण, रमेश पोवार, राजू पसारे, परीक्षित पन्हाळकर, दिलीप भुर्के, रणजित परमार, महेश जाधव, वैशाली डकरे, मीना सूर्यवंशी, कांचन कवाळे, आदी ३६ नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. महापालिकेसमोर मंगळवारी घडलेला प्रकार हा चुकीचा आहे. पोलिसांसमोरच माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न नगसेवकांनी केला. मला मारण्याच्या हेतूनेच हा हल्ला करण्यात आला असून ज्यांचा यात सहभाग होता त्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जमावबंदी आदेशाचा भंग
जमावबंदी आदेश लागू असताना उपमहापौरांसह नगरसेवकांनी एक जमाव करून महापौर माळवी यांची गाडी अडवून त्यांची मानहानी होईल, अशी घोषणाबाजी करून बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी कलम ३४२, ३४१, १४३, १४७, १४८,१४९, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.