"आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले, त्यामुळे...", भाजपाचा शरद पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 05:44 PM2024-02-24T17:44:20+5:302024-02-24T17:45:44+5:30
कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे.
BJP on Sharad Pawar (Marathi News) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. यावरून महाराष्ट्र भाजपाने पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांना यांना रायगडावर यायला वेळ नव्हता, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र भाजपाने ट्विटद्वारे शरद पवार यांच्यावर केली आहे.
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवार यांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करुन मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे.
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने श्री @PawarSpeaks यांना रायगडाची आठवण आली आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 24, 2024
सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग…
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना टोला लगावला आहे. किल्ले रायगडावर आज तुतारी वाजली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, ४० वर्षांनंतर शरद पवार हे रायगडावर गेले. अजित पवार यांना या गोष्टीचे क्रेडिट तर द्यावेच लागेल की, त्यांच्यामुळे ४० वर्षांनंतर शरद पवार यांना रायगडावर जावे लागले. त्यामुळे आता तुतारी कशी वाजते? कधी वाजते? कुठे वाजते? किती वाजते? हे भविष्यात कळेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
रायगडावर चिन्हाचा अनावरण सोहळा संपन्न
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच तुतारी वाजवणारा माणूस हे नवं पक्षचिन्ह दिले आहे. या चिन्हाचे अनावरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी महाराजांच्या कालखंडाचा उल्लेख करत आपल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे आवाहन केले आहे. "आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली असून ती मजबूत करायची आहे," अशी साद शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली आहे.