संवादामुळे अमराठीशी सुखाने संसार; व्याकरणात न अडकण्याचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:52 IST2025-02-23T05:52:14+5:302025-02-23T05:52:28+5:30
आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करण्याचा सूर

संवादामुळे अमराठीशी सुखाने संसार; व्याकरणात न अडकण्याचा संदेश
- चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलता असेल तर भाषा संसाराच्या आड येत नाही, संसार सुरळीत होतो, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादातून निघाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या विषयावरील परिसंवादात माजी परराष्ट्र सचिव आणि राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्या डॉ. साधना शंकर, आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मनोज कुमार आणि भारतीय भू-बंदर प्राधिकरणच्या सदस्या (वित्त) रेखा रायकर, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष, गायिका उद्योजक डॉ. मंजिरी वैद्य आणि प्रसन्न अय्यर या जोडप्यांनी सहभाग घेतला. विशेष पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. या परिसंवादाचे संयोजन अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी केले होते.
परिसंवादात मराठी-अमराठी संसारातील संवाद, कौटुंबिक नातेसंबंधांवरील परिणाम यावरही चर्चा झाली. भाषेमुळे संवाद होतो, व्याकरणात न पडता लोकांनी संवाद आपल्या आपल्या मातृभाषेत साधला पाहिजे, असे एक मत या परिसंवादात व्यक्त झाले.
मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चर्चासत्रात उमटला.
नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर आयोजित चर्चासत्रात बीव्हीजी समूहाचे हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर व वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी सहभागी झाले होते.
उद्योजक रवी पंडित म्हणाले, आपण आपल्या क्षेत्रात काम करताना ते काम चांगले असेल, तर तेच काम आपली ओळख निर्माण करते. आपल्या वागण्या-बोलण्यातून आपले व्यक्तिमत्त्व ठरते. आपण आपल्या क्षेत्रात ध्येयाने प्रेरित असाल, तर लोकही मागे उभे राहतात.
ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात मराठी पाऊल पुढे पडत आहे, ही आनंदाची बाब आहे. आपल्याला प्रगतीसाठी सर्वसामावेशक व्हावे लागणार आहे. वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी यांनी उद्योग व विविध क्षेत्रांतल्या प्रगतीत सहभाग, उद्योजकांचे योगदान व सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बदलाबाबत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.
मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावी
हणमंतराव गायकवाड म्हणाले, मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावी, एकमेकांना हातभार देणारी असावी. प्रत्येकाने आपल्याला काय काम करायचे आहे, ते ठरविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे, ज्या क्षेत्रात आनंद मिळतो, तो मिळवावा.
मराठी तरुणांनी आवडते क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, असे सांगून गायकवाड म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतकऱ्यांची प्रगती महत्त्वाची आहे. गावातच सर्व सुविधा मिळतील, अशा दृष्टीने नियोजनही महत्त्वाचे आहे.