वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 05:28 AM2018-08-15T05:28:55+5:302018-08-15T05:29:09+5:30
एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत.
मुंबई - एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत. तसेच कारगील युद्धात शहीद झालेले सुधारक भट यांचा मुलगा इंद्रजीत याला महामंडळात नोकरी देण्यात आल्याची माहिती मंगळवारी एसटी महामंडळाकडून दिली. सुधारक भट यांना वीरमरण आले, त्या वेळी त्यांचा मुलगा इंद्रजीत दोन वर्षांचा होता. तो वसई येथे वास्तव्यास असून आता त्याचे बी.ई.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. सध्या तो आगार
प्रभारक पदासाठी प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला उपलब्ध आगारांवर तत्काळ रुजू करण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील एकूण ६३९ वीरपत्नींना आजावीन मोफत एसटी प्रवास पास देऊन गौरविण्यात आले आहे. यात सातारा (९० वीरपत्नी), कोल्हापूर (७८), पुणे (७५) आणि सांगली (७१), सोलापूर (३३), रत्नागिरी (३०), सिंधुदुर्ग (३०), अहमदनगर (२९) अशी या जिल्ह्यातील वीरपत्नींचा समावेश आहे. दरम्यान काही वीरपत्नींनी आपली आर्थिक स्थिती चांगली असल्याने मोफत पास नाकारल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
१ मेपासून प्रारंभ : १ मे २०१८ पासून ‘शहीद सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सैन्य दलासह अन्य सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आजीवन मोफत प्रवास पास देण्यात येत आहे. त्याचबरोबर शहिदांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महामंडळात नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि
एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती.