जन्मदाते उठले जिवावर
By admin | Published: November 23, 2015 02:57 AM2015-11-23T02:57:08+5:302015-11-23T02:57:08+5:30
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जन्मदात्यांनी आपल्या मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. सोलापुरात आपल्या दोन मुलींची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यावर
सोलापूर/नांदेड : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जन्मदात्यांनी आपल्या मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. सोलापुरात आपल्या दोन मुलींची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यावर एका मातेने स्वत:वरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेडमध्ये घरात झोपलेल्या ३वर्षीय चिमुकलीचा पित्यानेच गळा दाबून निर्घृणपणे खून केला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरा मैल (बसवनगर) येथे भारती पापू राठोड (२७) ही सासू-सासऱ्यांसमवेत राहते. दोन वर्षांपूर्वी तिचा पती पापू राठोड हा अपघातात मरण पावला. रविवारी सकाळी घरी कोणीच नसताना भारतीने मुलगी काजल (७) व सोनाली (५) यांच्यावर धारदार शस्त्राने छाती व पोटावर वार केले. त्यात दोघीही जागीच मरण पावल्या.
पतीच्या निधनानंतर सासू-सासऱ्याबरोबर वारंवार भारतीचा वाद होत असे. त्यामुळे ती नेहमी मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उशिराने भारती शुद्धीवर आली तेव्हा ‘मीच माझ्या मुलींना मारले’ असे ती बडबडत होती, असे पोलिसांनी सांगितले.
वडिलांनी घोटला ३ वर्षीय मुलीचा गळा
नांदेडच्या कंधार तालुक्यातील मरशिवणी गावात शुक्रवारी सकाळी मारोती होणराव (३५) याने पत्नीला सरपण आणण्यास शेतात पाठवून तीन वर्षांची मुलगी शिवकन्याचा गळा आवळला. पत्नी परतली तेव्हा, तिला शिवकन्या ओरडताना दिसली. शिवकन्याला थंडीपासून बचावासाठी घातलेली टोपी काढून पाहिली असता गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसल्या़ हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांच्या मदतीने लेकीला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले़ मात्र रविवारी सकाळी शिवकन्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी मारोतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली.