एक दिवा उजळला जवानांच्या घरी
By Admin | Published: October 31, 2016 01:29 AM2016-10-31T01:29:18+5:302016-10-31T01:29:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षीची दिवाळी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या घरी साजरी करण्याचे आवाहन केले होते.
कोरेगाव भीमा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षीची दिवाळी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या घरी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिरूर तालुक्यातील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील भारतीय सैन्यदलातील जवान संदीप मारुती शिवले व बाप्पू भंडारे यांच्या घरी जात आपण जवानांच्याच कुटुंबातील सदस्य असल्याची भावना मनात ठेवून दिवाळी साजरी केली. प्रत्येक गावातील जवानांच्या घरी सामाजिक बांधिलकीतून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केले.
भारतीय सीमेवर जवान तैनात असल्याने १२५ कोटी भारतीय नागरिक सुरक्षित असल्याने आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करू शकतोय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर भारतीय सीमेवर गोळीबार केल्याने आपले जवान शहीद झाले. या वर्षीची दिवाळी आपण भारतीय जवानांच्या घरी जाऊन आपल्या घरातील एक दीप त्या जवानांच्या घरी लावून साजरी करण्याचा संकल्प ग्रामस्थ व शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ यांनी घेतला. संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील संदीप मारुती शिवले व बाप्पू भंडारे हे दोघेही भारतीय सीमेवर तैनात असल्याने जवानांच्या घरी जाऊन रांगोळ्या काढून, पणत्या लावून, फटाके उडवून ‘भारतमाता की जय’चा नारा देत दिवाळी साजरी करण्यात आली.
या वेळी संदीप शिवले व बाप्पू भंडारे या जवानांच्या घरी मिलिंद एकबोटे, वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, माजी सरपंच संदीप ढेरंगे, स्मृती समितीचे लक्ष्मण भंडारे, शांताराम भंडारे, माजी उपसरपंच संतोष शिवले, सोसायटीचे अध्यक्ष संजय शिवले, भाजपाचे माऊली भंडारे, ग्रामपंचायत सदस्य रमाकांत शिवले, सचिन भंडारे, संजय शिवले, संचालक सचिन शिवले, बाळू नानगुडे, देवा शिवले, संतोष शिवले, समीर शिवले आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)
पती सैन्यात असल्याचा अभिमान आहे
माझे पती सीमेचे रक्षण करत असताना तुम्ही सर्व ग्रामस्थ सामाजिक बांधिलकीतून आमच्या घरी येऊन स्वत: दारात रांगोळी काढून, पणत्या लावून आम्हाला मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा देत आमच्या कुटुंबाला आधार दिला. दिवाळी साजरी केल्याने माझे पती सैन्यात असल्याचा अभिमान वाटत असल्याचे संदीप शिवले या जवानाच्या पत्नी आरती शिवले यांनी सांगितले.