लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
By Admin | Published: May 6, 2016 05:10 PM2016-05-06T17:10:45+5:302016-05-06T17:17:16+5:30
तालूर येथे शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला़.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, निटूर, चाकूर येथे गारा पडल्या़.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ६ : निलंगा, अहमदपूर, चाकूर आणि रेणापूर तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, निटूर, चाकूर येथे गारा पडल्या़. गुरूवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला आहे़ रात्री लातूर शहरासह औसा, उदगीर येथे रिमझिम पाऊस झाला़ शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़.
त्यामुळे उष्णता कमी झाल्याचे जाणवत होते़ दरम्यान, दुपारी २ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात निलंग्यात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ १० मिनिटे गाराही पडल्या़ तसेच तालुक्यातील औराद शहाजानी निटूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़.
चाकुरात दुपारी अडीचच्या सुमारस अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती़ नळेगाव, शिरूरत अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथेही अवकाळी पाऊस झाला़.अहमदपूर शहरात दुपारी १० मिनिटे रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला़ तर तालुक्यातील किनगाव परिसरात तासभर मध्यम स्वरूपााचा पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यातील पानगाव परिसरात दुपारी २ वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली़.
वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर निलंगा तालुक्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ तर काहींच्या घरावरील पत्रे उडाली आहेत़. तीव्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे़ औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर शुक्रवारी कमाल तापमान ३५ अंशसेल्सिअस तर किमान तापमान १९ अंशसेल्सिअस नोंदले गेले आहे़ दोन दिवसापूर्वी कमाल तापमान ४२़५ अंशावर होते़