साहित्याचे नवे आयाम उजळणार
By admin | Published: May 31, 2016 01:55 AM2016-05-31T01:55:53+5:302016-05-31T01:55:53+5:30
दलित आणि ग्रामीण साहित्य वाचकांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही.
पुणे : दलित आणि ग्रामीण साहित्य वाचकांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही. हे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह देण्याच्या दृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे शब्दकोशांचे काम हाती घेण्यात आले आहे.
विशिष्ट शब्द असलेले साहित्यकृतीतील मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या नोंदीमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या शब्दकोशाचे दोन खंड प्रकाशित झाले असून २००५ सालाच्या पुढील शब्दांची ओळख करुन देण्याच्या दृष्टीने तिसऱ्या खंडाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दलित आणि ग्रामीण साहित्यातील अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग यांमुळे हे साहित्य काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले आहे. या संज्ञा वाचकांना सोप्या शब्दांत समजून घेता याव्यात, लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही. तसेच, या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने हे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह या कोशात देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे संचालक आनंद काटीकर यांनी सांगितले.
दलित आणि ग्रामीण साहित्यात वापरण्यात आलेले २००५ सालापर्यंतचे शब्दांचा संग्रह असलेले तीन खंड प्रकाशित झाले आहेत. त्यापुढील शब्दांचा शब्दकोशात समावेश करण्याच्या दृष्टीने काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यासपूर्ण संशोधन करण्यात आले.
संज्ञा, संकल्पना यांचे एकत्रीकरण करण्यात आले. गेल्या १० वर्षांमध्ये ग्रामीण आणि दलित साहित्याला नवी दिशा, नवे आयाम प्राप्त झाले आहेत. त्यादृष्टीने शब्दकोशही अद्ययावत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ संपादकांचे मंडळ स्थापन करण्यात आले. या अभ्यास समितीने तीनही खंडांचे परीक्षण करुन सुधारणा सुचवल्या. या सुधारणाही शब्दकोशामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)