अपु-या विजेमुळे राज्यभरात बत्ती गुल!, भारनियमनाचे भयानक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:18 AM2017-10-06T06:18:06+5:302017-10-06T06:21:11+5:30
महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे.
कमल शर्मा
नागपूर : महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे. नवी मुंबईसह ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या मोठ्या शहरांनाही याचा फटका बसला आहे. वीज ‘सरप्लस’ असल्याचा दावा करणाºया महाराष्ट्रात ही परिस्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीज उत्पादन केंद्रातील ३० पैकी १३ युनिट बंद पडले आहेत. यामध्ये पाच युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत तर इतर युनिट्सना अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक त्रुटी २४ तासांत दूर करणे आवश्यक असताना अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने वीजहानीनुसार नवीन ग्रुपप्रमाणे भारनियमनाचे वेळापत्रक तयार केले आहे. जिथे जितकी वीजहानी असेल तिथे त्याप्रमाणे अधिक भारनियमन केले जाईल.
दिवाळीत २४ तास वीज
दिवाळींच्या सुटीमुळे पाच दिवस बहुतांश उद्योग बंद राहतील. त्यामुळे विजेची मागणी कमी होईल व दिवाळीत सामान्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.
अभियंत्यांना कोंडले
नाशिकमधील आडगाव परिसरात याच भारनियमनाविरुद्ध संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या दोन अधिकाºयांना अर्धा तास कोंडले.
मंत्र्यांच्या दाव्याचे काय?
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ‘सरप्लस’ वीज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत भारनियमन सुरू झाले. आता ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिती दिली जाईल.
कारण? कोळसा कमी, तोही ओला!
महाजेनकोने केलेल्या दाव्यानुसार कोळशाच्या कमतरतेमुळे भारनियमन होत आहे. वीज केंद्रात कोळशाचा स्टॉक कमी असून तोसुद्धा ओला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोळसा ओला होत असतो. परंतु महाजेनकोने याबाबत सुरक्षेचे उपाय केलेले नाहीत.