‘जलयुक्त शिवार’मुळे अंधाराच्या दारी येईल प्रकाश!
By admin | Published: September 15, 2016 04:10 AM2016-09-15T04:10:41+5:302016-09-15T04:10:41+5:30
जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.
विकास पाटील, जळगाव
जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. एखाद्यावर्षी दुष्काळ आला तरी त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद बळीराजाकडे येईल,असे कविवर्य ना. धो. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अवघ्या मऱ्हाटी मुलुखाला निसगकवी म्हणून सुपरिचित असलेले महानोर शुक्रवारी (१६ सप्टेंबर) अमृतमहोत्वी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी पळासखेड्यातील साद घालणाऱ्या निसर्गाला कवेत घेत बळीराजाच्या कष्टापासून ते गावागावांमधील लिहिण्यासाठी पुढे येत असलेल्या तरुणाईचे भरभरुन कौतुक केले.
पळासखेडे या माझ्या २००-३०० उंबरठ्यांच्या गावाने माझ्यावर संस्कार केले. वाचनामुळे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली. सध्या वाचन संस्कृती कमी झाली आहे, हे खरं असले तरी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने वाचनात गुंतल्याचे दिसून येते. खेड्यापाड्यातून चांगल्या कथा, कादंबऱ्या येत असून त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होत आहे.
या सगळ्यांशी मी मैत्र बांधून आहे. आतापर्यंत जे साहित्यात दिसले नाही ते आता येऊ लागले आहे. लेखक, कवींनी साधना करावी, घाई न करता पुर्नलेखन करावे, असे केल्यास कसदार व पोत असलेल्या साहित्याची निर्मिती होईल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.
पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामती व पद्मश्री भवरलाल जैन, जळगाव यांच्या जैन उद्योग समुहाशी घट्टपणाने जोडून मला काम करता आले, हे माझे भाग्य मी समजतो. या कृषी पंढरीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वर्ष, दोन वर्षातून एकदा तरी भेट द्यावी. असे कळकळीचे आवाहनही केले.
महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर नितांत प्रेम केले. माझ्या कवितेचे गाणे केले. कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे जगण्याला बळ मिळाले. जनतेचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन आता उर्वरित आयुष्य शेतावरच घालविणार असल्याचे महानोर यांनी सांगितले.