सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांप्रमाणेच नवनीत राणांचेही तिकीट कापणार? अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:03 AM2024-03-27T11:03:48+5:302024-03-27T11:05:47+5:30
Anil Bonde on Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे.
बोगस जातप्रमाणपत्रावरून सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांना यावेळी लोकसभेचे तिकीट देण्यात आले नाही. भाजपाने त्यांचे तिकीट कापून बीडच्या राम सातपुते यांना दिले आहे. असाच नियम भाजपाअमरावतीमध्ये नवनीत राणांना लावणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. यावर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. येत्या १ एप्रिलला यावर निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राणांविरोधात आला तर भाजपा लोकसभा उमेदवारी देणार नसल्याची शक्यता आहे.
सोलापूरप्रमाणे अमरावतीतही भाजपा राणांना डच्चू देणार असल्याची चर्चा आहे. राणा भाजपाच्या तिकीटावरून लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपानेही अमरावतीची जागा भाजपाच्याच तिकीटावर लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या वक्तव्याने नवनीत राणांची धाकधूक वाढली असून, राणा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवनीत राणा यांचे नाव भाजप उमेदवाराच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेले नाही. अमरावती जिल्ह्यात भाजप इतकी मोठी आहे की सर्व नेते पात्र आहेत. सगळेच उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची याचा विचार केंद्रीय निवडणूक समिती करते. नवनीत राणा यांचे नाव भाजप उमेदवारांच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेले नाही. अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील ही एकच गोष्ट आतापर्यंत जाहीर झाली आहे, असा दावा बोंडे यांनी केला आहे.