विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:32 PM2024-07-27T14:32:31+5:302024-07-27T14:34:02+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरू झाल्यात. त्यात शरद पवारांनी हे भाष्य केले आहे.
छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीत राज्यात जसा निकाल लागला, त्यावरून विधानसभा निवडणुकीतही राज्यात लोकांना बदल हवाय. मविआ ज्यारितीने एकसंघ राहून लोकसभा लढली तशी विधानसभेला राहायला हवी, जर नाही राहिली तर आजच्या राज्यकर्त्यांना फटका बसेल पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल असं सूचक विधान शरद पवारांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतही लोकांना बदल हवाय. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लोकसभेला ज्यारितीने आम्ही एकसंघपणे लढलो तसं विधानसभेला ती एकसंघ येण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु त्याला मूर्त स्वरुप येणे गरजेचे आहे. हे आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. जर नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. लोकसभा निवडणुकीला भाजपाच्या काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेत आम्हाला ४०० जागा हव्यात, संविधानात बदल करायची अशी जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे लोकांच्यात अस्वस्थता होती. या देशात संविधानाने मुलभूत अधिकार दिला आहे. त्या अधिकारांवर गदा येण्याची भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे या विरोधात मतदान करण्याचा निर्धार जनतेने केला. त्यातून ४०० वरून २७० वर जागा आल्यात असं त्यांनी सांगितले.
तसेच मविआच्या बैठकांना सुरूवात झालीय, तिन्ही पक्षांनी ताळमेळ राहावा यासाठी काही नावं समोर आणलीत, संसदेच्या अधिवेशनानंतर पुढील बैठका होतील. काहीही झालं तरी जागांबाबत एकवाक्यता करावी, लोकांना चांगला पर्याय द्यावा यासाठी मविआत एकमत आहे. ३ पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष ज्यांनी लोकसभेत एकही जागा न मागता राज्यात सहकार्य केले. त्यांना काही जागा सोडाव्यात अशी माझी सूचना आहे. जेव्हा चर्चेला सुरुवात होईल तेव्हा त्यातून मार्ग निघेल असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
..तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही
चंद्राबाबू, नितीश कुमार यांच्या मदतीनं या सरकारची स्थिरता आहे. हे दोघेही पार्टनर जोपर्यंत मोदींसोबत आहेत तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही. गेली १० वर्ष सर्व सत्ता मोदींच्या हाती होती आणि आता या सत्तेत वाटेकरी आलेत. त्यामुळे काही दिवसांत काय परिस्थिती असेल ते कळेल. एका मुठीत आता सरकार नाही असं शरद पवारांनी म्हटलं.
आमदारांच्या घरवापसीचा निर्णय पक्षात चर्चा करूनच होईल
काही लोकांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण सरसकट सगळ्यांना घेण्याची मनस्थिती आमची नाही. जे लोक विचारांनी आमच्यासोबत होते, एकत्रित काम करण्याची मानसिकता त्यांची आहे. त्यांना फारसा कुणाचा विरोध असण्याची शक्यता नाही. मात्र काही जण असे आहेत ज्यांनी आमच्याविरोधात बरीच टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं, याची चर्चा आमच्या पक्षात होईल आणि त्यावर निर्णय होईल अशी माहिती शरद पवारांनी दिली.
लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवरून टोला
निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून अनेक घोषणा दिल्या गेल्यात, सरकारच्या तिजोरीत काय नाही मग देणार कुठून, निवडणुकीच्या आधी एखाद दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल. त्यातून जनमानस आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र लोकांच्या मनात हीदेखील चर्चा आहे की इतके दिवस सत्तेत असताना असे निर्णय का घेतले नाही. हे निवडणुकीसाठी तात्पुरतं आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल असं सांगत शरद पवारांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवर टोला लगावला आहे.