बॉम्बशोधक पथकातील लिलोचे निधन
By admin | Published: April 24, 2017 02:33 AM2017-04-24T02:33:57+5:302017-04-24T02:33:57+5:30
रायगड पोलीस दलातील लिलो कुत्र्याचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. लिलोवर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात
अलिबाग : रायगड पोलीस दलातील लिलो कुत्र्याचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. लिलोवर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लिलो गेली सात वर्षे बॉम्बशोधक पथकामध्ये कायर्रत होता.
रायगड पोलीस दलात लिलो हा अंदाजे दोन महिन्यांचा असतानाच दाखल झाला होता. २००८ साली लिलोला पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणासाठी पाठविले होते. लिलोचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला २०१० साली पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकात दाखल केले होते. लिलोने त्याच्या कार्यकाळात एकूण ७४६ कॉल यशस्वी केले होते. त्यातील बॉम्ब थ्रेडसंबंधी ६ आणि ५ बॉम्बसंदर्भातील अशा एकूण ११ कॉल्सचा समावेश आहे. त्यातील काही कॉल फेक निघाले होते. लिलोला आतापर्यंत २५ बक्षिसे सरकारच्या वतीने देण्यात आली
होती.
लिलो गेली १५ दिवस आजारी होता. अलिबाग शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होेते. उपचारास त्याचे शरीर प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे रविवारी नेण्यात येणार होते. मात्र सकाळी ९ च्या दरम्यान लिलोची प्राणज्योत मावळली. पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या डॉगचा काम करण्याचा कार्यकाळ साधारणत: १० वर्षांचा असतो. त्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती देण्यात येते. लिलोला पोलीस दलात ९ वर्षे पूर्ण झाली होती. पुढच्या मे महिन्यामध्ये लिलोला पोलीस दलातून निवृत्ती मिळणार होती.
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दुखवटा व्यक्त करून लिलोला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, सुरक्षा विभागाच्या श्रीमती बुरांडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)