दोन कोटी वृक्षांची लागवड लिम्का बुकात
By admin | Published: September 19, 2016 04:55 AM2016-09-19T04:55:26+5:302016-09-19T04:55:26+5:30
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात राबविण्यात आलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे.
चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात राबविण्यात आलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याने वन खात्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
१ जुलै २०१६ रोजी वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाने राज्यात १२ तासांत लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था संघटना आणि शासकीय यंत्रणांच्या मदतीने २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ वृक्ष लागवड केली गेली. १५३ प्रकारच्या प्रजातींच्या रोपांची लागवड ६५ हजार ६७४ जागांवर ६ लाख १४ हजार ४८२ लोकांच्या माध्यमातून केल्याच्या विक्रमाचीसुद्धा नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे.
सन २०१६-१७चा अर्थसकल्प विधानसभेत सादर करताना वित्त व वनमंत्री मुनगंटीवार यांनी राज्यात वनाच्छादन वाढावे आणि पर्यावरणाचा समतोल साधला जावा, यादृष्टीने राज्यात २ कोटी वृक्ष लागवड वनमहोत्सव साजरा करण्याचा संकल्प जाहीर केला होता. वृक्षसंपदा झपाट्याने नष्ट होत असल्याने हा संकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक होते, याची जाणीव मुनगंटीवारांना होती. त्यामुळे या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन जनजागृती केली. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह बैठकी घेतल्या. राज्यात महसूल विभागस्तरावर बैठकी घेऊन या वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे नियोजन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटून संबंधित विभागांच्या जागांवर वृक्षारोपणाची विनंती केली. तसेच भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपणास सकारात्मक प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)
>वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मेहनत
तरूणाईच्या सहभागासाठी ‘सेल्फी विथ ट्री’सारखी अभिनव स्पर्धा घेतली. दोन महिने वनमंत्री मुनगंटीवार यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. राज्यात २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ रोपांची विक्रमी लागवड करण्यात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यशस्वी ठरला.