‘आयएम’मधील पोकळी भरण्यासाठी सीमीची धडपड

By admin | Published: October 22, 2014 06:09 AM2014-10-22T06:09:17+5:302014-10-22T06:09:17+5:30

देशभरात झालेल्या कारवायांनंतर इंडियन मुजाहिद्दीनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सीमीची धडपड सुरू असल्याचे निरीक्षण सुरक्षा यंत्रणांनी नोंदविले आहे.

Limit conflicts to fill the gap in 'IM' | ‘आयएम’मधील पोकळी भरण्यासाठी सीमीची धडपड

‘आयएम’मधील पोकळी भरण्यासाठी सीमीची धडपड

Next

मुंबई : देशभरात झालेल्या कारवायांनंतर इंडियन मुजाहिद्दीनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सीमीची धडपड सुरू असल्याचे निरीक्षण सुरक्षा यंत्रणांनी नोंदविले आहे. १० आॅक्टोबर रोजी पुण्याच्या फरासखाना परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटामागे सीमीच्या मध्य प्रदेशातील मॉड्युलचा हात असावा, असा दाट संशय राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून व्यक्त होत आहे.
एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फरासखाना येथे बॉम्ब पेरणारे कोण, या बॉम्बस्फोटाचा कट आखणारे कोण, याची इत्थंभूत माहिती मिळाली असून संबंधित अतिरेक्यांचा शोध देशभरातील सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील बीजनोर येथे बॉम्बस्फोट घडविणारे सीमीचे मध्य प्रदेशातील मॉड्युलच फरासखाना बॉम्बस्फोटाच्या मागे आहे.
विशेष म्हणजे याच मॉड्युलने २००६मध्ये केरळात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते. हे प्रशिक्षण मुजाहिद्दीनचा अतिरेकी तौकीरने दिल्याची माहिती मिळते. याशिवाय २०१२मध्ये महाराष्ट्र एटीएसने सीमीच्या अतिरेक्यांची धरपकड केली होती.
त्यात गजाआड झालेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून मध्य प्रदेशातील मॉड्युल महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रुजविण्याच्या प्रयत्नात होते. वेळप्रसंगी मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांनी, स्लीपर सेलनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले होते.
देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी एकाचवेळी सुरू केलेल्या कारवायांमुळे मुजाहिद्दीनचे कंबरडे मोडले. मुजाहिद्दीन संपली, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. नेमकी हीच संधी साधून सीमीने फरासखाना येथे स्फोट घडवून भारतात दहशतवादी संघटनांचे अस्तित्व कायम असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना दिला.
मुजाहिद्दीनचे कंबरडे मोडलेले असताना हा स्फोट कोणी घडविला असेल, या विचाराने सुरक्षा यंत्रणा बुचकळ्यात पडल्या होत्या. मात्र यात सीमीचा सहभाग असल्याचे धागेदोरे सापडले आहेत. त्यामुळे इंडियन मुजाहिद्दीनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सीमी धडपड करीत असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणा वर्तवितात. (प्रतिनिधी)

Web Title: Limit conflicts to fill the gap in 'IM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.