जिल्ह्यात पोलिसांची संख्या मर्यादित

By admin | Published: August 24, 2016 01:22 AM2016-08-24T01:22:13+5:302016-08-24T01:22:13+5:30

कोपर्डी प्रकरणानंतर आपण अधिक संवेदनशील झालो आहोत.

Limit number of police in the district | जिल्ह्यात पोलिसांची संख्या मर्यादित

जिल्ह्यात पोलिसांची संख्या मर्यादित

Next


बारामती : कोपर्डी प्रकरणानंतर आपण अधिक संवेदनशील झालो आहोत. मात्र, जिल्ह्यातील ४४ लाख लोकसंख्येसाठी केवळ ३ हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे संख्याबळाची मर्यादा येते. पोलिसांकडे तुटपुंजे बळ आहे; मात्र तरीदेखील पोलीस समाजातील अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी केले.
बारामती शहर पोलीस ठाणे आणि बारामती पत्रकार मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला जनजागृती मेळाव्यात डॉ. जाधव बोलत होते. या वेळी डॉ. जाधव म्हणाले, ‘‘कायदा राबवून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी महिला, समाज यांचा पुढाकार आवश्यक आहे.
तरच, आपण समाज स्त्री अत्याचारमुक्त करण्यात यशस्वी होऊ. पालकांनी मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. मुलाच्या मैत्रिणीकडे कौतुकाने पाहणारा पालक मुलीच्या मित्राकडे मात्र संशयाच्या नजरेने पाहतो, हे चुकीचे आहे. त्यासाठी निकोप संवाद आवश्यक आहे.
पालकांनी तो मुलांशी मनामोकळेपणाने साधावा. विशेषत: मुलींशी ९ वीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पालकांचा सकारात्मक संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. पौगंडावस्थेचा काळ महत्त्वाचा असतो. नेमक्या याच काळात संवाद होत असताना पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुले ‘शेअरिंग’ टाळतात. देशात सर्वाधिक बलात्कार कुटुंबातील व्यक्तीकडून केले जातात. मुली, महिला घरीच सुरक्षित नाहीत.
उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वाढत्या छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती कार्यक्रमांबरोबरच समुपदेशनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
या वेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी आभार मानले.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले,
बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, असिफ खान, सलीम शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>या वेळी माजी नगराध्यक्षा भारती मुथा म्हणाल्या, ‘‘मुलींबरोबरच मुलांवर संस्कार करण्याचा पालकांनी प्रयत्न करावा. त्यातून चुकीचे प्रकार रोखले जातील.’’ नगरसेविका वनिता बनकर म्हणाल्या, ‘‘काही वेळा महिलांकडुन कायद्याचा गैरवापर करून चुकीचे आरोप केले जातात. कायद्याचा गैरवापर करू नये.’’ राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा सीमा चव्हाण म्हणाल्या, ‘‘आई ही खरी मैत्रीण असते. मुलींनी याच मैत्रीपूर्ण नात्याद्वारे समस्यांबाबत आईला माहिती द्यावी. त्यामुळे गंभीर प्रसंग टाळणे शक्य होईल.’’ वाहिन्यांवरील मालिकांचे भान ठेवा. नात्यांमध्ये असणाऱ्या विश्वासार्हतेची चाचपणी करा.नाते जोडण्यापूर्वीच ही चाचपणी आवश्यक आहे.

Web Title: Limit number of police in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.