रेषांचा जादूगार...
By admin | Published: January 29, 2015 03:22 AM2015-01-29T03:22:34+5:302015-01-29T03:22:34+5:30
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा आणि माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ऋणानुबंध होता.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा आणि माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ऋणानुबंध होता. विशेषत: पुण्यात त्यांच्यासोबत झालेली भेट अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तरळते आहे. सिम्बायोसिचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ‘लोकमत’मधील लेखांचे संकलन असलेल्या ‘कुपी’ या पुस्तकाचे प्रकाशन होते. या कार्यक्रमाला आर. के. लक्ष्मण आवर्जून उपस्थित होते. त्या वेळी त्यांचे वय तब्बल ८८ वर्षांचे होते. अर्धांगवायूच्या झटक्याने शरीराची एक बाजू निकामी झालेली; परंतु स्मरणशक्ती तल्लख आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा. सगळा कार्यक्रम अगदी उत्सुकतेने पाहत होते. कार्यक्रमादरम्यान ‘आपण एक ‘कार्टून’ काढावे,’ अशी विनंती मी त्यांना केली. कुंचला म्हणजे आर. कें.चा जीव की प्राण! माझ्या आग्रहाखातर त्यांनी लगेच चित्र रेखाटायला सुरुवात केली. रेषांच्या जादूगिरीतून काही फटकाऱ्यांतच श्री गणेशाचे चित्र साकार झाले. त्यांनी ते मला दाखविले. ‘‘तुम्ही गणेशाचे चित्र का साकारले?’’ असे मी त्यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्यामध्ये मला गणेशाचे रूप दिसले.’’ त्यांनी स्वत: माझे नाव टाकून आणि सही करून ते चित्र मला सप्रेम भेट दिले. आजही मी ते जपून ठेवले आहे.
लक्ष्मण यांची राजकीय व्यंग्यचित्रे बहारदार असत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांत टीका असायची. ताज्या घटनांवर औपरोधिक भाष्य आणि तेही सामान्यांच्या नजरेतून, हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य. इतका दीर्घ काळ व्यंगचित्रे काढणारा हा बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावा. त्यांचा ‘कॉमन मॅन’ गेल्या ५० वर्षांतील देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा साक्षीदार आहे. आर. के. लक्ष्मण यांच्याकडे भाषेच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची जबरदस्त हातोटी होती. कोणाही पत्रकाराला हेवा वाटावा, अशी विलक्षण निरीक्षणदृष्टी त्यांना लाभली होती. घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, अफाट बुद्धिमत्ता, आत्मविश्वास यांच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्ष वेधून घेतात. त्यांची अनेक व्यंगचित्रे ही खरमरीत, बोलकी आणि बोचरी असायची; पण त्यांमधून प्रांजळपणाचे दर्शन घडायचे. त्यामध्ये एक विचार असायचा. कोणाही व्यक्तीचे व्यंग दर्शविणारी चित्रे त्यांनी कधी काढली नाहीत किंवा कोणाला दुखावण्यासाठी त्यांनी आपल्या कुंचल्याचा वापर केला नाही. पत्रकारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ‘लोकमत’चे अतिथी संपादक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी केलेला संवाद प्रेरणादायी होता.
दर्डा कुटुंबीय आणि लोकमत परिवारातर्फे ‘कॉमन मॅन’च्या या जनकाला भावपूर्ण श्रद्धांजली.
- खासदार विजय दर्डा,
चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि.