युपीएच्या धर्तीवर देशातल्या तमाम शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी
By admin | Published: March 20, 2017 09:30 PM2017-03-20T21:30:11+5:302017-03-20T21:30:11+5:30
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 20 : मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुक त्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची उभी पीके व फलोत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीने केलेल्या या नुकसानीची भरपाई पीक विम्यातून होत नाही, यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून मराठवाड्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्यसभेत शून्यप्रहरात काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी केली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधोरेखित करतांना खासदार पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. विशेषत: मराठवाड्यात शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे दुष्काळाने हैराण केले. गतवर्षी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी लातूरला वॉटर ट्रेन पाठवावी लागली. यंदा पाऊस बरा झाल्याने खरीप व रब्बीचे पीक चांगले आले. त्यानंतर शेती व्यवसायाला नोटबंदीचा फटका बसला.सहकारी बँकांकडून रक्कम मिळत नसल्याने या काळात शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला शेतमाल विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांना तर खाजगी सावकारांकडून अधिक व्याजदराचे कर्ज उचलावे लागले. आता तीन दिवसांपूर्वी बिगरमोसमी पावसाच्या गारपीटीने अचानक शेतकऱ्यांना हैराण केले. निसर्ग आणि सरकारी निर्णय यांच्याशी सतत झुंज देत महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झाला असून राज्यातल्या प्रमुख पक्षांनी मागणी केल्यानुसार युपीए सरकारच्या धर्तीवर त्यांचे कर्ज माफ करावे, इतकेच नव्हे तर देशातल्या तमाम शेतकऱ्यांचे कर्ज केंद्राने किमान एकदा माफ करावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी शून्यप्रहरात केली.