वाराणसीच्या धर्तीवर नाशिकलाही ‘गंगाआरती’
By Admin | Published: August 28, 2016 02:34 AM2016-08-28T02:34:14+5:302016-08-28T02:34:14+5:30
वाराणसीच्या धर्तीवर नाशिकला गंगाआरती सुरू करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकला गंगाआरती सुरू करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, वन व पाटबंधारे खाते यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. त्यात लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील पर्यटनस्थळ विकसित करण्याबाबत सूचना मांडल्या.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी रामकुंडावर गंगाआरती सुरू करण्याची मागणी केली. त्यावर गंगाआरती सुरू करण्यासाठी तत्काळ २० लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे रावल यांनी सांगितले.
खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी सप्तशृंग गडावरील रोप-वे ट्रॉली सुरू करण्याबरोबरच हतगड येथे पर्यटनस्थळ विकसित करून तेथेही रोप-वे सुरू करण्याची मागणी केली. खा. हेमंत गोडसे यांनी अंजनेरी, त्र्यंबकेश्वर तसेच बोट क्लबबाबत सूचना मांडली. आ. सीमा हिरे यांनी नवश्या गणपती, सोमेश्वर ही तीर्थस्थळे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याची मागणी केली.
आ. दीपिका चव्हाण यांनी मांगीतुंगीसह साल्हेर व मुल्हेर ही स्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. आ. डॉ. राहुल अहेर यांनी चांदवडच्या रंगमहालाला हेरिटेजचा
दर्जा देऊन तेथे हेरिटेज हॉटेल सुरू करण्याची सूचना केली.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नाशिकला पर्यटनाच्या दृष्टीने एक स्वतंत्र विभागीय
केंद्र सुरू करण्याची सूचना मांडली. (प्रतिनिधी)