लिंगायत, धनगर एकत्र

By admin | Published: June 30, 2014 01:51 PM2014-06-30T13:51:26+5:302014-06-30T13:51:26+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलती आणि लिंगायत समाजाला आरक्षण या मागणीसाठी दोन्ही समाज एकत्र येऊन १५ जुलै रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मंत्री अण्णा डांगे यांनी दिली.

Lingayat, Dhangar together | लिंगायत, धनगर एकत्र

लिंगायत, धनगर एकत्र

Next

 

सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलती आणि लिंगायत समाजाला आरक्षण या मागणीसाठी दोन्ही समाज एकत्र येऊन १५ जुलै रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मंत्री अण्णा डांगे यांनी दिली.
सोलापुरात शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना डांगे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले. त्याचवेळी धनगर समाजाचा प्रश्न निघाली काढायला हवा होता. धनगर आणि धनगड असा शब्दच्छल करीत प्रशासकीय अधिकारी सरकारला चुकीची माहिती देत असल्यानेच आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय देताना अडथळे येत आहेत, असा आरोप करताना समाजावर अन्याय झाला तर आम्ही पक्षात तरी का राहावे, असा सवाल त्यांनी केला.
लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी जुनीच आहे. सुनील रुकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत लिंगायत आणि धनगर समाजाने एकत्र लढा देण्यावर एकमत झाल्याचे डांगे यांनी सांगितले. येत्या १५ जुलै रोजी दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्तपणे धडक मोर्चा काढतील. त्यानंतर दोन्ही समाजाच्या नेत्यांचे संयुक्त शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन व्यथा मांडणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.
या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, भाजपाचे कर्नल प्रभाकर लांडगे, धनगर महासंघाचे प्रा. संजय बनसोडे, देवेंद्र मदने, निर्मला पाटील, प्रा. रमेश आसापुरे यांचीही भाषणे झाली. बैठकीला विलास पाटील, राधाकृष्ण पाटील, प्रशांत फत्तेपूरकर, अनिल देवकर, तुकाराम कोळेकर, सिद्धारुढ बेडगनूर, यलगोंडा सातपुते, पंडित सातपुते, शिवलाल काळे, प्रा. विलास लेंगरे, शारदा बनसोडे, तुकाराम हाक्के, संतोष वाकसे, बाबूराव पेठकर, भीमराव गुंडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पिचड, पुरके यांचा अडथळा
१७ जूनच्या बैठकीत धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत झाले. विशेष आयोगाची स्थापना करून आठ दिवसांत अहवाल मागवण्याचे आदेश शरद पवारांनी दिले. त्यानंतर २४ आदिवासी आमदार एकत्र आले. मधुकरराव पिचड, वसंत पुरके यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेऊन धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यास विरोध करणारे पत्र सादर केले. त्यामुळे पिचड, पुरके यांचा अडथळा ठरू शकतो, अशी भीती डांगे यांनी व्यक्त केली.
..तर आमच्यासाठी रान मोकळे
धनगर समाजात आरक्षणाच्या प्रश्नावर प्रचंड असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आलाच आहे. येत्या ३0 जुलैपर्यंत आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर समाज सैरभैर होईल आणि आम्हालाही रान मोकळे होईल, असा निर्वाणीचा इशारा अण्णा डांगे यांनी दिला. 
मुख्यमंत्र्यांचे आठ दिवस
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांना धनगर समाजाच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. न्याय देण्यासाठी ते आग्रही आहेत. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेहमीच बिचकत आहेत. बैठकीत ते सहमत होतात, आठ दिवसांत आयोगाची नेमणूक करू, निर्णय घेऊ, असे सांगतात आणि त्यावर पडदा टाकतात. गेल्या वर्षभरात अनेकदा याचा प्रत्यय आला. त्यांचे आठ दिवस कधी संपतील, असा सवाल अण्णा डांगे यांनी उपस्थित केला. 

Web Title: Lingayat, Dhangar together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.