लिंगायत समाजाचा एल्गार; लातूरमध्ये धर्म मान्यतेसाठी समाज एकवटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:08 AM2017-09-04T04:08:28+5:302017-09-04T04:08:40+5:30
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लातुरात महामोर्चा काढण्यात आला.
लातूर : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लातुरात महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगण राज्यांतील लिंगायत समाजबांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ‘वब्ब लिंगायत.. कोटी लिंगायत...’च्या जयघोषाने लातूर दुमदुमले होते.
लिंगायत समन्वय समितीच्या वतीने क्रीडा संकुलातून सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महामोर्चास प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासह जगद्गुरू माता महादेवी, जगद्गुरू शिवमूर्ती मुर्धराजेंद्र महास्वामीजी, प.पू.डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज फडकावून महामोर्चाला प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजेपासून क्रीडा संकुलावर समाज बांधव एकत्र येत होते. ११.२० वाजता डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आगमन क्रीडा संकुलावर होताच ‘लिंगायत धर्म : स्वतंत्र धर्म; आम्ही लिंगायत, धर्म लिंगायत’ अशा घोषणांनी संकुल दणाणून गेले. या वेळी क्रीडा संकूल समाज बांधवांनी खचाखच भरले होते.
मोर्चात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि जगद्गुरू माता महादेवी, कोरणेश्वर महाराज रथातून सहभागी झाले होते. मोर्चाच्या प्रारंभी महिला, अग्रभागी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा रथ व समाजबांधव सहभागी झाले होते. शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुतर्फा स्वयंसेवकांनी साखळी केली होती. मोर्चा पुढे चालत असताना, मागे स्वयंसेवकांनी रस्त्यावर पडलेले पाण्याचे पाऊच, कचरा साफ केला. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बार्शी रस्त्यावर भव्य स्टेज उभारण्यात आले होते. या वेळी जगद्गुरू माता महादेवी, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन झाले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
मोर्चेकºयांच्या मागण्या-
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे, सन २०२१मध्ये होणाºया राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद करावी, लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनाने स्वतंत्र मंडळ व प्रकल्पाची निर्मिती करावी.
मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा
लिंगायत धर्म मान्यतेसाठी निघालेल्या महामोर्चाला विविध समाजातील संघटनांनी पाठिंबा दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शहरातील जागोजागी मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय केली, तसेच मोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर, मुस्लीम समाजाच्या वतीनेही महामोर्चा मार्गावर अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने पाण्याची सोय महामोर्चातील समाजबांधवांसाठी करण्यात आली होती.
लिंगायत जात नसून धर्म
- डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज
परदेशातील काही धर्मांना आपल्या देशात संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा आहे, परंतु या देशातील लिंगायत धर्माला तो अद्याप मिळाला नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन लिंगायत धर्माची जनगणनेत स्वतंत्र नोंद करावी, अशी मागणी केली होती. त्या वेळी त्यांनी ती मान्यही केली होती. मात्र, नंतरच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष झाले. लिंगायत जात नसून, धर्म आहे. लिंगायत धर्म हा मानवतेचा धर्म आहे. जात-पात मानणारा हा धर्म नाही. त्यामुळे या धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला पाहिजे, असेही डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज आपल्या आशीर्वचनात म्हणाले.