भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर यांचे निधन
By admin | Published: September 21, 2014 02:12 AM2014-09-21T02:12:27+5:302014-09-21T02:12:27+5:30
भाषाविज्ञान व साहित्य समीक्षेच्या प्रांतात संशोधकवृत्तीने आयुष्य वेचणारे ज्ञानव्रती डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
Next
औरंगाबाद : भाषाविज्ञान व साहित्य समीक्षेच्या प्रांतात संशोधकवृत्तीने आयुष्य वेचणारे ज्ञानव्रती डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. सध्या केळकर औरंगाबादमध्ये त्यांच्या कन्या डॉ. रोशन रानडे व जावाई मिलिंद रानडे यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आले. साहित्य क्षेत्रतील या अजोड योगदानासाठी त्यांना पद्मश्री व साहित्य अकादमी यासारख्या प्रतिष्ठेच्या सन्मानांनी गौरविण्यात आले होते.
केळकर यांचा जन्म पुण्यात झाला. रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी. ए. ऑनर्स व फग्र्युसन महाविद्यालयातून इंग्रजी व फ्रेंच विषयातील पदवी मिळविली. पुढे अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून भाषाविज्ञान व मानव संस्कृतीविज्ञान या विषयात संशोधन करून पीएच.डी. मिळविली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, राज्य मराठी विकास संस्था, मराठी अभ्यास परिषद, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ अमेरिका, नित्यभारती कथक
नृत्य अकादमी, अशा अनेक भाषा व कलासंवर्धनासाठी कार्यरत संस्थांमध्ये महत्त्वाचा पदभार त्यांनी
दीर्घकाळ सांभाळला. म्हैसूर
येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थानाच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (प्रतिनिधी)