भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:06+5:30

मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत.

Linguistic equality is the new stage of globalization : Anil Gore | भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा लक्षणीयरित्या वापर भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर सर्वच भाषांच्या विकासासाठी

मराठी लोकांनी शुध्द भाषा किंवा प्रमाण भाषा अशा वादात न अडकता भाषेचा सन्मान करायला हवा. प्रमाण भाषा पुस्तकांमध्ये वापरली जावी, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, बोलीभाषेत प्रमाण भाषेचा आग्रह धरणे अतिशयोक्तीचे आहे : अनिल गोरे  

..............................................

- प्रज्ञा केळकर-सिंग 
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे उर्फ मराठी काका यांना जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी साधलेला संवाद.   

.....................

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे?  
-  महाराष्ट्राइतका भाषेबाबतचा भेदभाव जगात इतरत्र कोठेच पहायला मिळत नाही. स्थानिक भाषेबाबतच दुजाभाव उपयोगाचा नाही. भेदभाव दूर केल्यास भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित होईल. सध्याच्या काळात भाषिक समानता अत्यंत गरजेची आहे. किंबहुना भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत, केवळ घोषणा होणे बाकी आहे. अभिजातचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी राखून ठेवलेला असू शकतो. आपली सत्ता धोक्यात आली आहे, असे वाटेपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही, असे माझे मत आहे. भाषा हे राजकारणाचे मोठे हत्यार असते आणि राजकीय लोक स्वत:च्या सोयीनुसार योग्य वेळी हे हत्यार वापरत असावेत.
 

मराठी भाषिकांमध्येच भाषेची उदासिनता कशामुळे ?
मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत. सामान्य माणसाचे ७० टक्के  आयुष्य शासनाशी संबंधित असते. मात्र, मराठीचा आग्रह धरला तर आपण मुर्ख ठरू, अशी भीती नागरिकांना वाटते. इतर राज्यांमध्ये दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये करण्याची सोय असल्याने टोकाची भाषिक अस्मिता पहायला मिळते. महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. बँक, न्यायालय, मोबाईल अशा अनेक ठिकाणी मराठीतून व्यवहार करणे सोपे झाले आहे. अस्मिता व्यक्त करण्याची साधने उपलब्ध झाली की लोकांचे भाषाप्रेमही आपोआप दिसू लागते.
 

शाळांमध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे?
 बऱ्याच इंग्रजी शाळांमध्ये मुले एकमेकांशी मराठीत बोलतात. मात्र, इंग्रजी भाषेतच संवाद साधावा असा आग्रह शिक्षकांकडून केला जातो. मराठीत बोलणे कमीपणाचे मानले जाते. मात्र, ज्यांना मराठी नीट बोलता येत नाही, त्यांचे इंग्रजीही कच्चे राहते, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती झाल्यास मुलांना अर्थछटा, शब्दछटा समजू लागतील आणि त्यांचे भाषिक कौशल्य वाढीस लागेल. भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर त्याचा उपयोग सर्वच भाषांच्या विकासासाठी होतो. 
...........
व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढणार नाही, तोवर बदल घडणार नाहीत. त्यामुळे व्यापारामध्ये मराठीचा वापर व्हायला हवा. उदाहरणादाखल, मार्केटिंगसाठी आलेल्या कोणत्याही कॉलला मराठीतच उत्तर द्यायचे असे प्रत्येकाने ठरवल्यास कॉल सेंटरला मराठी भाषेचा वापर वाढवाला लागेल आणि मराठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

Web Title: Linguistic equality is the new stage of globalization : Anil Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.