तरल भावकवी मा.कृ. ब. निकुम्ब यांची पुण्यतिथी

By Admin | Published: August 9, 2016 09:33 AM2016-08-09T09:33:19+5:302016-08-09T10:31:26+5:30

एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते कविवर्य कृ. ब. निकुम्ब यांची आज (९ ऑगस्ट) पुण्यतिथी.

Liquid Bhavkavi M.K. B Death anniversary of Nicumb | तरल भावकवी मा.कृ. ब. निकुम्ब यांची पुण्यतिथी

तरल भावकवी मा.कृ. ब. निकुम्ब यांची पुण्यतिथी

googlenewsNext
संजीव वेलणकर
पुणे, दि. ९ - एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते कविवर्य कृ. ब. निकुम्ब यांची आज पुण्यतिथी. २२ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेवे कवी निकुम्ब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. ‘घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात...’ असे हळूवारपणे लिहिणारे कृ. ब. निकुम्ब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते.
 कृ. ब. निकुम्ब लिंगराज कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा मा.निकुम्ब प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता,  ज्ञानेश्वचरी सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून मा.निकुम्ब समजावून द्यायचे. 
कवी कृ.ब.निकुंब यांची 'घाल घाल पिंगा वाऱ्या' ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. या कवितेला कमलाकर भागवत यांनी अत्यंत करुण चाल लावली अन त्यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी आर्त स्वरात हे गाणं असं काही गायलं की पुर्वी रेडीओवर हे गाणं लागलं की सर्व वयाच्या सासूरवाशिणी हमसून हमसून रडत असत !! आजही या गाण्याची अवीट गोडी टिकून आहे एक भावकवी आणि `मृगावर्त’ या नावीन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुम्ब परिचित आहेत. `पारख’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सूक्ष्मता आणि निश्चितता, शैलीचे ललित्य आणि संयम या विशेषांचा समन्वय तर ह्या समीक्षालेखांत झालाच आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की, `केकावली’त संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडते किंवा बालकवींच्या कवितेत जोडाक्षराचे दाठरपण मोडून त्याला सुकुमार रूप प्राप्त होते, यांसारखी लहानमोठी अपरिचित सौंदर्यस्थळे निकुंबाना अचूक गवसली होती. 
कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशयघन आहेत. मृगावर्त, पंखपल्लवी, ऊर्मिला, उज्वला, अनुबंध हे त्यांचे लेखन होय. मा.कवी निकुंब यांचे ३० जून १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.कवी निकुंब यांना आदरांजली
- संदर्भ. समीर गायकवाड.
 
मा.कवी निकुंब यांच्या गाजलेल्या कविता- 
 
घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात
 
घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !
"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परि मन खंतावतं !
विसरली का ग भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.
 
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय... !"
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !
 
 
तुझी वाट चुकणार नाही या माझ्या मयसभेत
थबकणार नाहीस तू भव्य महाद्वाराशी
सप्तरंगी उन्हात झळको खुशाल त्याचे गोपुर!
तुला माहीत आहे कुजबुजणारी अंधुक वाट
वळणावळणाने जाणारी, श्वासाने उबदार होणारी
महाद्वारातून जाणारे फसव्या प्रपाताचे कौतुक करीत
नसत्या हिरवळीवर कोसळतील
त्यावेळी तू पोहोंचलेली असशील, अचूक
कमळाच्या तळ्यावर, धुंद धुक्यात लपलेल्या...
राजरस्ता, महाद्वाराकडून येणारा 
कित्येक योजने दूर आहे या तळ्यापासून
कधीमधी-म्हणतात-भांबावून जातो
त्यातून वावरणा~याना
ह्या गूढ कमळांचा मुग्ध सुवास!
महाद्वारांनी जाणारांसाठी महाद्वारे आहेत-
तुझ्यासाठी
आहे ती श्वासांची वाट या माझ्या मयसभेत!!
 
कृ. ब. निकुंब
 

 

Web Title: Liquid Bhavkavi M.K. B Death anniversary of Nicumb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.