न झालेल्या १९ बढत्यांची यादी पोलिसांच्या वेबसाइटवर
By admin | Published: July 18, 2015 02:43 AM2015-07-18T02:43:24+5:302015-07-18T02:43:24+5:30
लिपिक ते कार्यालय अधीक्षक पदांवर काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांच्या न झालेल्या बढत्यांची यादी गेल्या शुक्रवारी महाराष्ट्र पोलीस दलाची वेबसाईट असलेल्या महापोलीस डॉट कॉमवर गुरुवारी जाहीर झाली.
राजेश निस्ताने , यवतमाळ
लिपिक ते कार्यालय अधीक्षक पदांवर काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांच्या न झालेल्या बढत्यांची यादी गेल्या शुक्रवारी महाराष्ट्र पोलीस दलाची वेबसाईट असलेल्या महापोलीस डॉट कॉमवर गुरुवारी जाहीर झाली. आता ही यादी रद्द करून ती कशी आणि कुणी जाहीर केली, याचा तपास पोलीस महासंचालक कार्यालयाने सुरू केला आहे.
पोलिसांच्या बदल्या, बढत्या व प्रत्येक फेरबदलाबाबत ही वेबसाईट अपडेट केली जाते. बदल्यांच्या हंगामात तर पोलीस यंत्रणा क्षणोक्षणी यादी जाहीर झाली का म्हणून ही वेबसाईट लॉगआॅन करतात. या वेबसाईटवर येणारी प्रत्येक माहिती अधिकृतच असते. मात्र पोलीस यंत्रणेचा हा समज गुरुवारी खोटा ठरला. लिपिकांना कार्यालय अधीक्षकपदी तात्पुरती बढती देणारे आदेश १० जुलैला महापोलीस डॉट कॉमवर जारी करण्यात आले होते. १९ लिपिकांची ही यादी होती. त्यांच्या नियुक्तीची ठिकाणेही दर्शविली गेली होती. एवढेच नव्हेतर, या लिपिकांच्या पदोन्नतीवर यापूर्वी झालेल्या बदल्यांची ठिकाणे नव्याने त्यांच्या सोयीने सुचविण्यात आली होती.
या यादीची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी पोलीस महासंचालक कार्यालयाने बिनतारी संदेश जारी केला. त्यात या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या लिपिकांच्या कार्यालय अधीक्षक पदावरील बढतीच्या यादीशी महासंचालक कार्यालयाचा संबंध नसल्याचे नमूद केले. तसेच महासंचालक कार्यालयाने ही यादी जारी केली नसून ती रद्द समजण्यात यावी, ती चुकीने प्रसिद्ध झाली, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी तांत्रिक कारण पुढे करण्यात आले आहे.
ही यादी आता वेबसाईटवरून हटविण्यात आली आहे. यात कुणाचा सहभाग आहे की वेबसाईट हॅक करून त्याच्यासोबत छेडछाड केली याची चौकशी सुरू आहे.
अशी आहेत ‘ओएस’ची नावे
चुकीने का होईना कार्यालय अधीक्षक (ओएस) पदावरील बढतीच्या यादीत स्थान मिळालेल्यांमध्ये माधवी जाधव, हर्षद म्हात्रे, ज्ञानेश्वर येडशीकर, पांडुरंग सिंगनाथ, संजय गुजर, सुरेंद्र दंडवते, श्रीधर कळमनकर, भीमराव गायकवाड, चरणदास भगत, श्याम पडगीलवार, आत्माराम जाधव, माधुरी घोडे, श्यामराव वडपलवार, रमेश देवडेकर, श्रीकांत खरतडे, रमेश टेकाम, रवींद्र बडकस, साधना लांडगे, देवजी कांबळे यांचा समावेश होता.