अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
By admin | Published: June 21, 2016 03:33 AM2016-06-21T03:33:20+5:302016-06-21T03:33:20+5:30
अकरावी आॅनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सोमवारी प्रदर्शित करण्यात आली. याआधी अर्जांमध्ये भरलेली माहिती विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर
मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सोमवारी प्रदर्शित करण्यात आली. याआधी अर्जांमध्ये भरलेली माहिती विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर अॅप्लिकेशन आयडीद्वारे तपासता येणार आहे. शिवाय त्यात आवश्यकतेनुसार बदलही करता येणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना अर्जात भरलेल्या माहितीत बदल करायचा असेल, त्यांनी संबंधित शाळेशी किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज रिसेट करून अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड वापरून नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.
चव्हाण यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज आॅनलाईन सादर केला नसेल, त्यांना प्रवेश प्रक्रियेचा भाग १ निश्चित करून कन्फर्म करता येईल व भाग २ कन्फर्म करून अर्ज आॅनलाईन सादर करता येईल. तर अल्पसंख्याक, इन-हाऊस किंवा व्यवस्थापन कोट्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ भरला नसेल, तर तो भरून कन्फर्म करणे आवश्यक आहे. २१ व २२ जून या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना हे बदल करता येतील. (प्रतिनिधी)
सहा विद्यार्थ्यांना १०० टक्के
सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार एकूण २ लाख १७ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ५८९ आहे. त्यात २ हजार ०६० विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले आहेत. तर ६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत.