अकरावीची दुसरी विशेष गुणवत्ता यादी जाहीर
By admin | Published: August 23, 2016 08:05 PM2016-08-23T20:05:22+5:302016-08-23T20:05:22+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता.
२२,२७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी, तिसऱ्या फेरीसाठी ४० हजार ४८१ जागा शिल्लक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश बदल देण्यात आला असून, ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष
फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुसऱ्या विशेष फेरीसाठी अकरावीच्या एकूण ६२ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील २२ हजार २७३ जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ९ हजार ९१० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, तर ३ हजार १६२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २ हजार ८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. त्यामुळे एकूण १५ हजार ८० विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालयात प्रवेश देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरी सुमारे ७ हजार १९३ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तिसऱ्या विशेष फेरीमध्ये पुन्हा अर्ज करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पहिल्या तीन पसंतीक्रमातील महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसोबत दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश बदलाच्या संधीपासून वंचित राहिलेल्या ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुलै महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतरच तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता
आहे. तरी अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीसाठी अद्याप ४० हजार ४८१ जागा उपलब्ध आहेत.
दहीहंडीच्या सुटीने प्रवेश वेळापत्रकात बदल
जुन्या वेळापत्रकानुसार, दुसऱ्या विशेष फेरीमधील गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे बुधवार व गुरुवारी म्हणजेच २४ आणि २५ आॅगस्ट रोजी संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र राज्य शासनाने मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना गुरुवारी, २५ आॅगस्ट रोजी दहीहंडीनिमित्त सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी प्रवेश प्रक्रिया होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी २५ आॅगस्टऐवजी शुक्रवारी, २६ आॅगस्टला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखानिहाय निश्चित करण्यात आलेले प्रवेश :
कला १,४४०
वाणिज्य १४,३८१
विज्ञान ६,४५२
एकूण २२,२७३