चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
By Admin | Published: September 10, 2016 12:57 AM2016-09-10T00:57:21+5:302016-09-10T00:57:21+5:30
अकरावीच्या चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
पुणे : अकरावीच्या चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये २ हजार ३३८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. या फेरीसाठी एकूण २ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने शुक्रवारी चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली. या फेरीसाठी दहावीच्या पुरवणी परीक्षेतील १ हजार ८०१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी, तर ५९४ एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण १ हजार ७६१ विद्यार्थी आणि ५७७ एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना दि. १०, दि. १२ व दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत अॅलॉट केलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. या फेरीतील प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिला जाणार नाही, असे विभागीय उपसंचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.
चौथी फेरी पूर्ण झाल्यानंतर पाचवी विशेष फेरीही घेतली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक दि. १७ सप्टेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यापूर्वी या फेरीसाठी मार्गदर्शनपर वर्ग हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात दि. १७ व १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घेतले जाणार असल्याची माहिती टेमकर यांनी दिली. (प्रतिनिधी)