मंत्रालयात आत्महत्या रोखण्याचा अजब फंडा, गेटवरच लावली धमकी देणा-यांची यादी
By admin | Published: January 3, 2017 02:17 PM2017-01-03T14:17:22+5:302017-01-03T16:29:37+5:30
आत्महत्या तसंच आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या गेटवरच अशा लोकांची यादी लावून टाकली आहे जे आत्महत्या करण्याची शंका आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - आत्महत्या तसंच आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या गेटवरच अशा लोकांची यादी लावून टाकली आहे जे आत्महत्या करण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात माधव कदम नावाच्या एका शेतक-याने मंत्रालयाबाहेर आत्महत्या केली होती. यानंतर मंत्रालयातील पोलीस सतर्क झाले आणि आत्महत्या करु शकतात अशा लोकांची माहिती काढण्यास सुरुवात केली.
मंत्रालयातील पोलिसांनी मुख्य गेटवर अशा लोकांची यादी आणि फोटो लावले आहेत ज्यांनी भुतकाळात काही समस्या निर्माण केली होती किंवा आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मंत्रालय सुरक्षेचे प्रमुख पोलीस उपायुक्त शांतिलाल भामरे यांनी, 'आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याची धमकी देणा-यांची यादी आम्ही तयार करतो. त्याशिवाय आझाद मैदानात निदर्शन करणारेही मंत्रालयासमोर येऊन गोंधळ घालत असतात. हे लोक सरकारी कामकाजात अडथळा आणतात. आम्ही ही यादी गेटवर असणा-या सुरक्षारक्षकाकडे देतो. यामधील कोणी जर मंत्रालयात येताना दिसलं तर त्यांना येण्याचं कारण विचारलं जातं. काही शंका असल्यास त्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केलं जात,' असं सांगितलं आहे.
'अनेकदा आत्महत्या करण्याच्या हेतूनं मंत्रालयात आलेले लोक आम्ही असं काही करणार नाही हे लिखित स्वरुपात देतात तेव्हाच त्यांना जाऊ दिल जातं,' असंही भामरे यांनी सांगितलं आहे. या यादीमध्ये एकूण 37 नावे होती ज्यामधील तिघांनी लिखित स्वरुपात आश्वासन दिल्याने त्यांची नावे हटवण्यात आली आहेत. लोकांना याची माहिती मिळावी यासाठी मुख्य गेटवर संगीता शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या माळ्यावरील कार्यालयाबाहेर साध्या कपड्यांमध्ये पोलीस नेहमी तैनात असतात. जर कोणावरही हलका संशय जरी आला तर त्या व्यक्तीला तिथेच रोखले जाते.
मार्च 2016 रोजी माधव कदम या शेतक-याने दुष्काळाला कंटाळून मंत्रालयासमोर विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. यानंतर पोलिसांना पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला होता.