साहित्य संमेलन संपले, शहरवासीयांसाठी उरल्या केवळ आठवणी

By admin | Published: January 20, 2016 01:16 AM2016-01-20T01:16:09+5:302016-01-20T01:16:09+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता सोमवारी रात्री झाली

Literary meet ends, city dwellers only remember | साहित्य संमेलन संपले, शहरवासीयांसाठी उरल्या केवळ आठवणी

साहित्य संमेलन संपले, शहरवासीयांसाठी उरल्या केवळ आठवणी

Next

पिंपरी : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता सोमवारी रात्री झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या सारस्वतांच्या या आनंदोत्सवाच्या गोड आठवणी घेऊन साहित्यिक रसिकांनी ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरीस निरोप दिला. संमेलनस्थळी उभारण्यात आलेले मंडप, ग्रंथदालने, विविध महापुरुषांचे पुतळे काढून घेणे, स्वच्छता करण्याची लगबग मंगळवारी सुरू होती. चैतन्यमय झालेला परिसर आज काहीसा भकास दिसू लागला. गेल्या चार दिवसांत या परिसराला जत्रेचे स्वरूप आल्याने खवय्येगिरी आणि खेळणीविक्री यांतून कोट्यवधींची उलाढाल झाली.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर संत ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी वसविली होती. ८४ फुटांचा लांब पेन, वीस फुटी उंचीचे संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज, महासाधू मोरया गोसावी यांचे भव्य पुतळे, बारा हजार आसनक्षमतेचा भव्य सभामंडप, अडीच हजार आसनक्षमतेचे दोन उपमंडप, चारशे ग्रंथदालने, मीडिया सेंटरची उभारणी केली होती. कल्पकतेतून या ठिकाणी साहित्यनगरी उभारली होती. परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकवाचन करताना मुले असलेल्या शिल्पाकृती उभारलेल्या होत्या. तसेच विद्यापीठाचे बोधचिन्हही लक्षवेधी ठरले होते. चार दिवस सुरू असणाऱ्या सोहळ्यास राज्य, देशभरातील, तसेच देशाच्या विविध भागांतील सुमारे पाच लाख रसिकांनी भेट दिली होती. या ठिकाणी वेगळेच चैतन्य संचारले होते. तुडुंब गर्दी होती. सोमवारी सायंकाळी या आनंदोत्सवाची सांगता झाली. संमेलन संपल्यानंतर रात्री दहानंतर ग्रंथदालनात मांडलेली पुस्तके एकत्रित करून ती व्यवस्थितपणे खोक्यांमध्ये भरून ट्रक, टेम्पोत साहित्य भरण्याची प्रकाशकांची लगबग सुरू होती.
व्यासपीठावर मागील बाजूस आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकवाचन करतानाच्या शिल्पाकृती उभारल्या होत्या. सोहळा संपताच साहित्याची आवराआवर करण्यात मंडप उभारणारे ठेकेदार व त्यांचे कर्मचारी मग्न असल्याचे दिसून आले. मान्यवरांसाठी तयार केले आलिशान गेस्ट हाऊसचे साहित्य काढण्याची लगबग दिसून आली. तसेच पॅनेलच्या माध्यमातून तयार केलेल्या ग्रंथदालनाचे पॅनेल काढून घेण्यात आले.
रसिकांना सोहळा व्यवस्थितपणे दिसावा, यासाठी एलसीडी स्क्रीन उभारल्या होत्या. त्या एलसीडी स्क्रीन, रोषणाई आणि व्यासपीठावरील विद्युतदिवे, मर्क्युरी लॅम्प, मान्यवरांसाठी ठेवलेले सोफे, खुर्च्या आदी साहित्य जमा करण्याची, तसेच लोखंडी चॅनेलमध्ये उभारलेले पत्र्याचे मंडप सोडण्याचे काम सुरू होते. तसेच संमेलनस्थळी अंथरलेल्या रेड आणि ब्ल्यू कारपेटच्या घड्या घालून हे कारपेट ट्रकमध्ये भरत असल्याचे दिसून आले. ८३ फुटांचा लक्षवेधी असणारा पेन, संत ज्ञानेश्वर आणि तुकाराममहाराज, महासाधू मोरया गोसावी, आचार्य अत्रे, पु. ल. यांच्या शिल्पाकृती एकत्रित करून त्या वाहनांच्या माध्यमातून संमेलनस्थळावरून हलविण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
स्वच्छतेचीही लगबग
संमेलनस्थळी महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेली स्वच्छतागृहे हलविण्याचे काम सुरू होते. तसेच भेट देणाऱ्या नागरिकांनी टाकलेली पुस्तकांची पत्रके, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या आदी साठलेला कचरा एकत्रित करण्याचे काम सुरू होते. तसेच सकाळी उपाहारगृहासाठी आणलेले साहित्यही ठेकेदाराने हलविले. प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, पाण्याचे ग्लास एकत्रित सफाई कर्मचारी भरून नेत होते.
अनेकांना मिळाला रोजगार
संमेलनस्थळी पिण्याच्या पाण्यापासून ते सार्वजनिक स्वच्छतागृह, भोजन-नाष्ट्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली होती. तर परिसरातील रस्त्यावरही नाष्ट्याच्या गाड्या उभ्या होत्या. तसेच काही खेळण्यावाल्यांनीही संमेलनस्थळाबाहेर दुकाने थाटली होती. संमेलनाने या भागातील दुकानदारांनाही रोजगार दिला.

Web Title: Literary meet ends, city dwellers only remember

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.