साहित्य संमेलन यवतमाळला! ४५ वर्षांनंतर संधी, महामंडळाच्या बैठकीत पसंतीची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:41 AM2018-07-04T00:41:05+5:302018-07-04T00:41:27+5:30
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाची रविवारी नागपुरात बैठक झाली त्यामध्ये वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती मिळाली.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाची रविवारी नागपुरात बैठक झाली त्यामध्ये वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती मिळाली. वर्ध्याच्या आयोजकांनी यवतमाळला संमेलन होणार असेल तर आम्हाला आनंदच वाटेल, अशी भूमिका घेतल्याने हे नाव नक्की होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यवतमाळ येथील डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय, तसेच विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेने आगामी संमेलनाचे यजमानपद मिळविण्यासाठी साहित्य महामंडळाला निमंत्रण पाठविले होते. सहा प्रस्तावांपैकी वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती दिली.
- संमेलन स्थळाची पाहणी करण्यासाठी साहित्य महामंडळाची समिती लवकरच यवतमाळात येणार असल्याची माहिती डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते,सचिव प्रा. घन:शाम दरणे यांनी ‘लोकमत’ला दिली. पालकमंत्री मदन येरावार संमेलनासाठी उत्सुक असून आयोजनाच्या दृष्टीने सोमवारी त्यांनी डॉ. रमाकांत कोलते यांच्या निवासस्थानी येऊन सविस्तर चर्चाही केली.