साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका निश्चित होणार १६ नोव्हेंबरला
By admin | Published: November 5, 2014 04:18 AM2014-11-05T04:18:05+5:302014-11-05T04:18:05+5:30
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ घोषित झाल्यानंतर संमेलनात कोणत्या कार्यक्रमांची मेजवानी मिळणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना लागली आहे
पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ घोषित झाल्यानंतर संमेलनात कोणत्या कार्यक्रमांची मेजवानी मिळणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना लागली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गुलबर्गा येथे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका निश्चित होणार आहे.
पंजाबच्या घुमान येथे ३ ते ५ एप्रिल दरम्यान हे साहित्य संमेलन होत आहे. संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे संमेलन प्रथमच होत असून या ठिकाणी मराठी भाषकांची संख्या अत्यंत कमी आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनामध्ये कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात, याकडे समस्त साहित्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे हे गुलबर्ग्याचे आहेत. त्यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. बैठकीत संमेलनातील परिसंवादाचे विषय आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या साहित्यिकांची नावे ठरविण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)