साहित्य संघात ‘रंगोत्सव’!
By admin | Published: April 29, 2016 03:17 AM2016-04-29T03:17:22+5:302016-04-29T03:17:22+5:30
मुंबई मराठी साहित्य संघ, नाट्यशाखा आणि दी गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगोत्सव २०१६’ साजरा करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघ, नाट्यशाखा आणि दी गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगोत्सव २०१६’ साजरा करण्यात येणार आहे. ५ ते १० मे या कालावधीत हा महोत्सव पार पडणार असून, याचे उद्घाटन नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते होणार आहे. हा संपूर्ण महोत्सव नाट्य रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.
‘गड्या आपला गाव बरा’ या अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ, निर्मित नाट्य प्रयोगाने या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर शेक्सपिअरचे हिंदी रूपांतरित नाटक ‘ज्युलिएट और रोमिओ’, ‘इन्शाअल्ला’, ‘ हंडाभर चांदण्या’, ‘असूरवेद’ हे नाट्यप्रयोग सादर होतील. महोत्सवाचा समारोप साहित्य संघाच्या ‘संगीत प्रीतिसंगम’ या नाटकाने होईल. या वर्षी घेण्यात आलेल्या साहित्य संघ आयोजित नाट्य संगीत स्पर्धेतील स्पर्धक संगीत प्रीतिसंगम नाटकात सहभागी आहेत. या नाटकाचे संगीत मार्गदर्शन ज्येष्ठ गायक अरविंद पिळगावकर व अरुण पुराणिक यांचे आहे. नाटकाचे दिग्दर्शक अरुण पालव व विलास म्हामणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)