विद्यापीठाकडून साहित्य मेजवानी
By admin | Published: February 27, 2017 05:32 AM2017-02-27T05:32:28+5:302017-02-27T05:32:28+5:30
‘आयडॉल’तर्फे सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा होत आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील दूर व मुक्त अध्ययन संस्था अर्थात ‘आयडॉल’तर्फे सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा होत आहे. त्या निमित्ताने कालिना येथील संकुलात दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान साहित्यप्रेमींसाठी ‘अनुवादाचे मोती मराठीत’ हा अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आयडॉलच्या संचालिका डॉ. अंबुजा साळगावकर, इंग्रजी साहित्याचे लेखक डॉ. संतोष राठोड व सहायक संचालक डॉ. संजय रत्नपारखी हे अनुवादाचे अनुभव कथन करणार आहेत. मुंबईतील एका खासगी कंपनीतर्फे ‘अभिनय : नट-श्रोते संवादाची वैश्विक भाषा’ या विषयावर कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे संचालन अनिता सलीम व आर्यमा सलीम करणार आहेत.
विद्यापीठाच्या चर्चगेट येथील शाहीर अमर शेख सभागृहात ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांचे ‘अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीला होणारे फायदे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)